वरूड : रुग्णवाहिकेच्या अतिरिक्त दरामुळे हैराण झालेले रुग्ण, नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित दरपत्रक लागू केले आहेत. हे दरपत्रक प्रभारी तहसीलदार धबाले, ठाणेदार चौगावकर यांच्याकरवी प्रत्येक रुग्णवाहिकेच्या दर्शनी भागात चिकटविले आले आहे.
रुग्णवाहिकेच्या प्रवास भाड्याबाबत मनमानी कारभार व अतिरिक्त रक्कम उकळण्याचा गोरखधंदा सुरू होता. याला चाप लावण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासकीय दरपत्रक ठरवून दिले. यामध्ये ० ते २५ किमीकरिता साधी मारुती व्हॅन ८०० रुपये, टाटा सुमो ९०० रुपये , टाटा ४०७ या वाहनाकरिता १२०० रुपये, आयसीयू सुविधा २००० रुपये असे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरविले आहेत. २५ किमीनंतर प्रतिकिमी १५ ते २५ रुपयांपर्यंत भाडे पडणार आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालकाने कसूर केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये , दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सदर भाडेदरामध्ये चालकाचा आणि इंधनाचा खर्चसुद्धा समाविष्ट असल्याने अतिरिक्त पैसे आकारता येणार नाही, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
वरूड पोलीस विभाग आणि महसूल विभागाने प्रत्येक रुग्णवाहिकेवर दरपत्रकाचे स्टीकर दर्शनी भागात लावले. यावेळी प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले, ठाणेदार प्रदीप चौगावकर, पीएसआय कृष्णा साळुंके, वाहतूक सहायक उपनिरीक्षक अनिल माहुरे, द ग्रेट मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गुर्जर, विशाल आजनकर, यशपाल राऊत, बबलू भोरवंशी, अमित करिया हे उपस्थित होते.