-आता 'टार्गेट' ‘गौरी ईन’; तपासणी आटोपली
By Admin | Updated: July 11, 2015 00:31 IST2015-07-11T00:31:37+5:302015-07-11T00:31:37+5:30
येथील ‘महेफिल’विरुद्ध कोटींच्यावर दंड आकारल्यानंतर महापालिका प्रशासनाने बांधकाम तपासणीचा मोर्चा ...

-आता 'टार्गेट' ‘गौरी ईन’; तपासणी आटोपली
आयुक्तांचे आदेश : विनापरवानगी अथवा अतिरिक्त बांधकाम असल्यास दंडात्मक कारवाई
अमरावती : येथील ‘महेफिल’विरुद्ध कोटींच्यावर दंड आकारल्यानंतर महापालिका प्रशासनाने बांधकाम तपासणीचा मोर्चा नागपूर महामार्गालगतच्या रहाटगावस्थित गौरी ईन हॉटेलकडे वळविला आहे. शुक्रवारी सहायक संचालक नगर रचना विभागाची चमू गौरी ईनमध्ये पोहचली. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करण्यात आले, अथवा नाही? हे मोजमाप करुन वस्तुनिष्ठ अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.
शहरातील हॉटेल्स, रिसोर्ट, लॉजींगच्या बांधकामाची तपासणी करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी जारी केले आहे. त्यानुसार सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चमुने गौरी ईन हॉटेलचे मंजूर बांधकामाप्रमाणे ते करण्यात आले किंवा नाही? यासाठी मोजणी केली.
गौरी ईनच्या बांधकामाची तपासणी आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. मंजूर नकाशाप्रमाणे सदर बांधकाम तपासण्यात आले आहे. यात काही चुकीचे आढळल्यास तसा अहवाल आयुक्तांसमोर सादर केला जाईल. आयुक्तांच्या आदेशाने कारवाई होईल.
- सुरेंद्र कांबळे, एडीटीपी, विभाग.