तपोवनातील मुलींचे अखेर स्थानांतरण!
By Admin | Updated: December 29, 2014 23:33 IST2014-12-29T23:33:36+5:302014-12-29T23:33:36+5:30
विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते.

तपोवनातील मुलींचे अखेर स्थानांतरण!
११५ मुली हलविल्या : होलीक्रॉस, चांदूरच्या बालगृहात दाखल
अमरावती : विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते.
तपोवनात कनिष्ठ वरिष्ठ बालगृह हे मुलामुलींचे आणि आणि निराधार-निराश्रीत हे केवळ मुलींचे अशी दोन बालगृहे आहेत. या दोन्ही बालगृहांत एकूण ११५ मुली वास्तव्यास होत्या. या बालगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे समाजमन सुन्न झाले होते. त्यानंतर सामाजिक संघटना आणि प्रसिद्धी माध्यमांनी न्यायाची मागणी उचलून धरल्यावर दोषींवर कारवाई सुरू झाली. अनेक मासे त्यात अडकू लागलेत. प्रकरण झाकण्यापलिकडे गेल्याचे लक्षात आल्यावर, येथे मुली असुरक्षित आहेत. त्यांना आवश्यक संरक्षण प्रदान करण्याची संस्थेची आर्थिक क्षमता नाही, अशी सबब पुढे करून मुलींचे इतरत्र स्थानांतरण करण्याची विनंती महिला व बाल कल्याण समितीला संस्थेने एका पत्राद्वारे केली होती. एव्हाना बाल कल्याण समितीही याच निर्णयाप्रत पोहोचली होती. संस्थेकडूनच पत्र आल्यानंतर बालकल्याण समितीने मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार आज अंमलबजावणी करण्यात आली.
अमरावतीच्या होलीक्रॉस बालगृहात १७, चांदूरबाजारच्या मुले व मुलींचे बालगृह येथे ५४ मुली स्थानांतरीत करण्यात आल्यात. ४४ मुलींना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले. सकाळी ११.३० पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली.
महिला व बाल कल्याण समितीचे सर्व पदाधिकारी तसेच पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त एस.एन.तडवी हे यावेळी जातीने उपस्थित होते. (प्रतिनिधी)