‘त्या’ भरकटलेल्या महिलेची कुटुंबाच्या शोधार्थ तगमग
By Admin | Updated: October 26, 2016 00:11 IST2016-10-26T00:11:41+5:302016-10-26T00:11:41+5:30
परराज्यातील एक महिला जखमी अवस्थेत बडनेरा मार्गावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती.

‘त्या’ भरकटलेल्या महिलेची कुटुंबाच्या शोधार्थ तगमग
इर्विनमध्ये आक्रोश : संवादात भाषेचा अडसर
अमरावती : परराज्यातील एक महिला जखमी अवस्थेत बडनेरा मार्गावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती. तिला १०८ रूग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिच्याशी संवाद साधण्यात भाषेचा अडसर येत असून आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत आणि घरापर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली तिची तगमग बघवत नाही. तिचा आक्रोश पाहून परिचारिकांची मनेही हेलावली. तिचे हिरावलेले कुटुंब परत मिळवून देण्याकरिता महिला बालविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल चौकात ४० वर्षे वयोगटातील महिला जखमी अवस्थेत पडून होती. तिच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने ती रक्कबंबाळ झाली होती. काही नागरिकांनी सौजन्य दाखवून १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले आणि तिला इर्विनमध्ये दाखल केले. सद्यस्थितीत तिच्यावर वार्ड क्रमांक ९ मध्ये उपचार सुरू आहेत. तेथील वरिष्ठ परिचारिका अलका सिरसाट त्या महिलेची विशेष काळजी घेत आहेत. आज तीच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा जाणवली. मात्र, तिची तुटक-तुटक भाषा कोणाच्याही लक्षात येण्यासारखी नसल्याने ती नेमकी कुठली, हे कळू शकले नाही. मात्र, अलका शिरसाट यांनी तिला बोलके करून तिच्या हावभावावरून बरेच काही जाणून घेतले. ती महिला आंध्रप्रदेशातील भाषा बोलते, वालमादेवीचे नाव घेते. तिला तिच्या मुलांना भेटायचे आहे. त्यासाठी तिचा आक्रोश सुरू आहे. तिला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवून देण्याकरिता परिचारिका शिरसाट झटत आहेत.
त्यांनी या महिलेबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली आहे. तसेच महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा दिले आहे. त्यांनी ‘त्या’ महिलेच्या संगोपनासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली असून तिला अकोला येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. मात्र, त्या महिलेची काळजी घेता-घेता निर्माण झालेल्या जिव्हाळ्यामुळे तिला सुधारगृहात नव्हे तर हक्काचे घरच मिळावे, यासाठी अलका सिरसाट झटत आहेत. त्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी परिचारिका सिरसाट यांची आहे. मात्र, यासाठी कोण पुढाकार घेणार, हा खरा प्रश्न आहे. महिला बालविकास अधिकारी कार्यालयाने या महिलेच्या कुटुंबाचा शोध घेऊन तिची तिच्या आप्तेष्टांसोबत भेट घडवून आणावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी त्या संबंधितांचे उंबरठे झिजवित आहेत. (प्रतिनिधी)
लैंगिक अत्याचार तर झाला नाही ना ?
राज्याबाहेरील महिलेला अमरावती आणले कुणी, ती जखमी झाली कशी, तिच्यावर लैंगिक अत्याचार तर झाला नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात पोलीस विभागाला कळविण्यात आले आहेत. मात्र, त्या दिशेने अद्याप पोलिसांनी चौकशी सुरु केलेली नाही.