तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा बेमुदत संप
By Admin | Updated: April 27, 2016 00:17 IST2016-04-27T00:17:52+5:302016-04-27T00:17:52+5:30
राज्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा बेमुदत संप
तहसीलदारांकडे चाव्या सुपूर्द : कार्यालयांना टाळे
अमरावती : राज्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९६ मंडळ अधिकारी तर ५१४ तलाठी जिल्ह्यात संपावर गेले आहेत. दरम्यान तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना चाव्या सुपूर्द करून बेमुदत संपावर जात असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर येथील विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली. या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. तलाठी कार्यालयांना टाळे लावण्यात आले. तसेच अमरावती तहसील कार्यालयांतर्गत मंडळ अधिकारी, तलाठी १०० टक्के बेमुदत संपावर गेल्यामुळे नियमित काम प्रभावीत झाल्याचे दिसून आले. २६ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत संपावर शासन, प्रशासन स्तरावर तोडगा निघेस्तोवर कामकाज सुरू करणार नाही, अशी भूमिका मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी घेतल्यामुळे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. येथील तहसील कार्यालयात तलाठी, मंडळ अधिकारी एकत्रित येऊन मागण्यांबाबत बैठक घेतली. त्यानंतर तहसीलदार सुरेश बगळे यांना मागण्यांचे निवेदन वजा कार्यालयांच्या चाव्या सुपूर्द केल्या. शासन स्तरावर मागण्यांचा विचार होईस्तोवर बेमुदत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका विदर्भ पटवारी संघ उपविभाग अमरावतीचे अध्यक्ष एस. आर. उगले, सचिव ए. एम. पाटेकर यांनी घेतली. यावेळी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मागण्यांची पुर्तता करण्यासाठी जोरदार नारेबाजी करुन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आंदोलनात संतोष चपटे, सुनील भगत, यू. आर. शेगावकर, महेंद्र कंगाले, नीलिमा अंभोरे, डी.एम. धोटे, एम. पी. देशमुख, डी. जी. गावनेर, एस. आर. भगत, एम. डी. सांगळे, आर. एल. बाहेकर, एम. एस. धर्माळे, आर. आर. काळबांडे, टी.एस. मोहोड, जे. जी. लांडगे, एन. के. लोथे आदी उपस्थित होते. तलाठ्यांनी जलयुक्त शिवार, पाणी टंचाई आदी कामांना प्राधान्य देण्याचे ठरविले.(प्रतिनिधी)