जबाबदारी पाळा, निकष तातडीने पूर्ण करू
By Admin | Updated: August 25, 2014 23:43 IST2014-08-25T23:43:23+5:302014-08-25T23:43:23+5:30
एसटी महामंडळातील गैरव्यवहार थांबवून चोख जबाबदारी सामूहिकपणे पार पाडल्यास कामगारांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिले.

जबाबदारी पाळा, निकष तातडीने पूर्ण करू
अमरावती : एसटी महामंडळातील गैरव्यवहार थांबवून चोख जबाबदारी सामूहिकपणे पार पाडल्यास कामगारांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिले. स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालक-वाहकांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षीय बोलत होते.
नागपूर व अमरावती विभागातील अपघात विरहित चालक-वाहकांच्या आयोजित सत्कार सोहळ्याला महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, जि. प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, एसटी महामंडळाचे संचालक आनंदराव पाटील, वाहतूक महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर, नागपूरचे प्रादेशिक नियंत्रक ए.एन.गोहत्रे, कामगार प्रतिनिधी व प्रादेशिक सचिव उदय पवार, प्रादेशिक व्यवस्थापक एम.बी. पटारे, विभाग नियंत्रक के.एस. महाजन यांच्यासह सत्कारमूर्ती चालक-वाहकांची सपत्नीक उपस्थिती होती. सर्वप्रथम एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात गोरे पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा सत्कार सोहळा पार पडावा यासाठी मी आज येथे उपस्थित झालो. एसटी महामंडळाचा डोलारा चालविताना व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात नियोजन असणे गरजेचे आहे. यामागील उद्देश हाच की, सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी. तेव्हाच खऱ्या अर्थाने मंडळाचा कारभार सुरळीत चालेल. यात प्रवाशांचेही सहकार्य आवश्यक आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मागण्या करतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपला विभाग इतरांवर अवलंबून न राहता स्वत: सक्षम राहणे गरजेचे आहे हे पटवून देताना त्यांनी मजेशीर उदाहरण दिले की, मुलाचे कौतुक इतरांच्या तोंडून ऐकल्यानंतर बापाला समाधान वाटते. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी कौतुकास्पद पार पाडावी. या सत्कार सोहळ्यात पात्र चालक व वाहक तसेच त्यांच्या पत्नींचेही गोरे यांनी स्वागत केले.
यामध्ये सेवेत रुजू झाल्यापासून २५ वर्षे अपघात विरहित सेवा देणे ही फार मोठी जबाबदारी आहे. हे करीत असताना कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचविता तण-मन संस्कार, आचरण शुद्ध ठेवून चोख जबाबदारी पार पाडणाऱ्या चालक-वाहकांचा सत्कार हे अगत्याचेच आहे. चालक आणि वाहक हे एसटी महामंडळाचा कणा आहेत. त्यांच्या चोख भूमिकेवरच महामंडळाची प्रतिमा अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी इमानेइतबारे पार पाडलेल्या जबाबदारीचे कौतुक करून त्यांचा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सत्काराचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये १२५ चालक-वाहकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यामध्ये त्यांना १४ हजार रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह, विशेष कार्य केल्याचा बिल्ला असे पुरस्काराचे देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार तर प्रास्ताविक व आभार एसटी महामंडळाचे संचालक एम.बी. पठारे यांनी केले.