नायलॉन मांजावर बंदीसाठी ठोस पावले उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:10 IST2018-01-16T00:10:18+5:302018-01-16T00:10:55+5:30
पक्षी संवर्धनासाठी सोमवारी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

नायलॉन मांजावर बंदीसाठी ठोस पावले उचलणार
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पक्षी संवर्धनासाठी सोमवारी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नायलॉन मांजाच्या प्रतिबंधावर काटकोर अमंलबजावणी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन स्वाक्षरी अभियानाच्या उद्घाटनाप्रंसगी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिले.
शहरातील राजकमल चौकात महापालिका, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, वसा संस्था व दिशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पक्ष्यांचे प्रतीकात्मक छायाचित्र असलेल्या फलकावर सायंकाळपर्यंत शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून पक्षी संवर्धनाबाबत एकमत दर्शविले. सकाळी ११.३० वाजता या अभियानाचे उद्घाटन महापौर संजय नरवणे व पोलीस उपायुक्त पंडित यांनी केले.
अंधांची स्वाक्षरी, १२ अंगठे
स्वाक्षरी अभियानात चार अंध मुलांनीही स्वाक्षरी करून जागरूकतेचा परिचय दिला. १२ निरक्षरांनी अंगठ्याचे ठसे देऊन स्वाक्षरी अभियानास प्रतिसाद दिला.
तिवस्यात पतंगाच्या मांजाने एक जखमी
तिवसा : पतगांच्या मांजा गळ्यात अडकल्याने शहरात एक वृत्तपत्र विक्रेता जखमी झाल्याची घटना पोलीस ठाण्यानजीक घडली. दैव बलवत्तर असल्याने ते बचावले.
हेमंत निखाडे असे जखमीचे नाव आहे. सोमवारी सकाळी ते दुचाकीने जात होते. पोलीस ठाण्याजवळ त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. गळ्याभोवती मांजाचा आळ बसणार एवढ्यात त्यांनी गाडी थांबविली. यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, यात ते जखमी झाले. त्यांना तात्काळ संदीप देशमुख यांचा दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हेमंत निखाडे यांना सुटी देण्यात आली.
नायलॉन मांजावर बंदी आणली असल्याने साध्या धाग्याला धाग्याला काचमिश्रित रसायन लावून मांजा तयार केला जातो. यामुळे धागा मजबूत होतो; मात्र कुणालाही जखम करू शकतो.