'बिल्दोरी'च्या पुलाची निविदा पुढील आठवड्यात काढा

By Admin | Updated: August 8, 2015 00:05 IST2015-08-08T00:05:54+5:302015-08-08T00:05:54+5:30

चार बळी घेणाऱ्या दुर्गवाडा येथील बिल्दोरी नाल्यावर नवीन पूल बांधण्यासाठी पुढील आठवड्यात निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ...

Take the bid for Bildori bridge next week | 'बिल्दोरी'च्या पुलाची निविदा पुढील आठवड्यात काढा

'बिल्दोरी'च्या पुलाची निविदा पुढील आठवड्यात काढा

विभागीय आयुक्तांचे मुख्य अभियंत्यांना आदेश
अमरावती : चार बळी घेणाऱ्या दुर्गवाडा येथील बिल्दोरी नाल्यावर नवीन पूल बांधण्यासाठी पुढील आठवड्यात निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मुख्य अभियंता सी.व्ही.तुंगे यांना शुक्रवारी दिले. 'लोकमत'ने गावकऱ्यांचा आक्रोश अन् चार जणांच्या बलिदानाच्या वेदना लोकदरबारात पोटतिडकीने मांडल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.
बिल्दोरी नदीच्या ज्या पुलावरून कार पाण्यात कोसळली नि बुडाली, तो पूल नेहमीच पाण्याखाली असतो. नवा पूल बांधून द्या, या मागणीसाठी दुर्गवाडा, आलवाडा, धारवाडा येथील ग्रामस्थांनी पाच दिवस पाण्यात बसून अभिनव आंदोलन छेडले होते. त्यावेळी पुलाची मागणी मंजूर करण्यात आली खरी; परंतु तिला आजतागायत मूर्त स्वरुप येऊ शकले नाही.
विभागीय आयुक्तांनी रेटला होता मुद्दा
अमरावती : या पुलाच्या मागणीची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी गंभीर दखल घेतली होती. दोन आॅगस्ट रोजी पुलाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली होती. चार आॅगस्ट रोजी अमरावती येथे वित्त खात्याचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव सतिश गवई आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी या पुलासाठी निधी देणे का आवश्यक आहे, हे उपस्थितांना पटवून दिले होते. त्यानुसार, विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी पुलासाठी निधी देण्याचे तत्त्वत: मान्य केले होते. अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते हेदेखील त्या बैठकीत उपस्थित होते. पूल बांधण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून घ्यावी लागते. गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर मंजूर झालेला पूल नेमकी ही मंजुरी न आल्यानेच रखडला होता. आता किमान दुर्दैवी घटनेनंतर तरी ही कार्यवाही विनाविलंब व्हावी यासाठी विभागीय आयुक्तांनी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या आदेशात कालमर्यादाच घालून दिली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात या पुलासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली की लगेच पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकेल.

Web Title: Take the bid for Bildori bridge next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.