शिक्षकबदली प्रश्न मार्गी लावू
By Admin | Updated: November 7, 2016 00:19 IST2016-11-07T00:19:42+5:302016-11-07T00:19:42+5:30
मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी,

शिक्षकबदली प्रश्न मार्गी लावू
निवेदन सादर : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे आश्वासन
अमरावती : मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, या मागणीसह इतर प्रमुख मागण्या घेऊन दोन नोव्हेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू झालेल्या बेमुदत धरणे व उपोषण आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी शहरात पालकमंत्री प्रवीण पोटे दाखल होताच त्यांनी आंदोलनाची दखल घेत आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात बदलीग्रस्त शिक्षकांनी पालकमंत्री पोटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले .
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न दिवसेंदीवस तापत असुन अद्याप पर्यंत आंदोलनाच्या पाचव्या व आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रशासनाने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्ते शिक्षक अधिकच तापले आहेत.
प्रशासनाने तीन दिवस धरणे आंदोलनाची दखल न घेतल्याने काल चार नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री व शिक्षणमंत्री याची महाआरती ओवाळून आमरण उपोषणाची सुरवात करण्यात आली . पहिल्या दिवशी पंधरा शिक्षक उपोषणाला बसलेत ज्यात दोन शिक्षिका व तेरा शिक्षकांचा समावेश आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे शहरात दाखल होताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बदलीग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत बदलीग्रस्त शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत वाढदिवसाच्या भरगच्च कार्यक्रमातही सविस्तर चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांवरील अन्याय दुर करून लवकरच या प्रश्नाचा छळा लावण्यात येईल.
याप्रकरणी नियमबाह्यपणे शिक्षकांची पदे भरणाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी आपण शासन स्तरावर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलीग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाहीसुद्धा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाला पालकमंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे आंदोलन सुरू केल्यानंतरही याची दखल प्रशासकीय यंत्रणेने घेतली नाही. यामुळे उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्री उपोषणकर्त्या शिक्षकांना भेटणार
पालकमंत्री प्रवीण पोटे सोमवारी बदलीग्रस्त आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार आहेत . आंतरजिल्हा बदली प्रश्नी शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसह भूमिपूत्र शिक्षकांना न्याय मिळवून देण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.