बडनेरातील ‘ते’ वृक्ष तोडले
By Admin | Updated: January 21, 2017 00:16 IST2017-01-21T00:16:19+5:302017-01-21T00:16:19+5:30
फांदी तोडण्याची जुजबी परवानगी घेऊन अख्खे वृक्ष तोडण्याचा गोरखधंदा अवैध वृक्षतोड माफियांनी सुरू केला आहे.

बडनेरातील ‘ते’ वृक्ष तोडले
फांदी तोडण्याची परवानगी : घटनास्थळाचा पंचनामा
अमरावती : फांदी तोडण्याची जुजबी परवानगी घेऊन अख्खे वृक्ष तोडण्याचा गोरखधंदा अवैध वृक्षतोड माफियांनी सुरू केला आहे. ही घटना बडनेरा नवी वस्तीच्या पवननगरात शुक्रवारी उघडकीस आली आहे. मात्र नागरिकांच्या सजगतेने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात पडकण्यात यश आले आहे.
बडनेरा शहरात विकास कामांच्या नावाखाली यापूर्वी प्राचीन वृक्षे तोडण्यात आली आहेत. अवैधरीत्या वृक्ष तोडल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी ठेवले जात असताना याकडे महापालिका, वन विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. बडनेरा शहरात अनेक ठिकाणी अवैध वृक्ष तोडीचे लाकूड साठवून ठेवले जात असताना त्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, असे चित्र आहे. आता तर वृक्षतोड माफियांनी वृक्ष तोडण्यासाठी फांदी तोडणयाची परवानगी घेवून मुळासकट झाड कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. मात्र फांदी तोडण्याची परवानगी मिळविताना अवैध वृक्षतोड माफिया हे महापालिका अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करीत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पवननगरात खुल्या जागेवर अवैध वृक्षतोड करताना नागरिकांना काही व्यक्ती दिसून आले. संपूर्ण झाड मुळासकट तोडत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार बघून प्रकाश पहुरकर व प्रकाश बोरकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. नेमके कशाची परवानगी आहे, हे तपासले पाहिजे यासाठी काही नागरिक एकत्रित आले. दरम्यान महापालिकेचे अधिकारी कमलाकर किटे घटनास्थळी पोहोचले. मात्र वृक्षतोड करणारे पोबारा झाले होते. वृक्षतोडीसंदर्भात जाणून घेतले असता केवळ फांदी तोडण्याची परवानगी असल्याचे प्रथर्मदर्शनी दिसून आले. हा प्रकार बघून कमलाकर किटे अवाक् झाले. वृक्षतोडप्रकरणी पंचनामा करण्यात आला. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे महापालिका प्रशासनाने फार गांभीर्याने घेतले नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)