शेतीपिकांवर संक्रांत
By Admin | Updated: January 6, 2015 22:52 IST2015-01-06T22:52:28+5:302015-01-06T22:52:28+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शेतीपिकांवर संक्रांत
शेतकरी चिंतेत : ढगाळ वातावरण, थंडी, धुके पिकाच्या मुळावर
अमरावती : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके व गारपीट यामुळे रोगट वातावरण पसरले आहे. कांदा पीक वाढीच्या स्थितीत असतानाच वातावरण बदलाचा परिणाम होत आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४१ हजार ३६० हेक्टर क्षेत्रात गहू, ९० हजार ११२ हेक्टर क्षेत्रात हरभरा, ६ हजार हेक्टर क्षेत्रात कांदा, १ लाख ९४ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रात कपाशी व ५० हजार हेक्टर क्षेत्रात फळपिके, १० हजार हेक्टर क्षेत्रात भाजीपाला, अशी स्थिती आहे.
सध्याच्या प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक परिणाम संत्रापिकावर होत आहे. मृग बहराचा एक चतुर्थांश संत्रा अद्याप झाडावर आहे. कमी भावामुळे कित्येक बागा विकल्या गेल्या नाहीत. या फळांची गळ होण्याची शक्यता आहे. आंबिया बहर कितपत फुटणार याची शंका आहे. गहू पिकावर करपा, अती थंडीमुळे तांबेरा होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला पाऊस पोषक असला तरी धुक्यामुळे अळी व फुलगळ होण्याची शक्यता आहे. कापूस ओला होत आहे तर उशिरा बहरलेल्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सतत नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.