वरुडात स्वाईन फ्लूचा धसका
By Admin | Updated: September 4, 2015 00:33 IST2015-09-04T00:33:34+5:302015-09-04T00:33:34+5:30
तालूक्यात विषाणुजन्य तापाची साथ सुरु झाली असून स्वाईन फ्लूमुळे एक बळी गेला आहे.

वरुडात स्वाईन फ्लूचा धसका
खासगी-शासकीय रूग्णालये तुडूंब : आरोग्य विभाग सतर्क
वरुड : तालूक्यात विषाणुजन्य तापाची साथ सुरु झाली असून स्वाईन फ्लूमुळे एक बळी गेला आहे. दुसरीकडे तापाच्या साथीने तालुक्यात कहर केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी असाच साथरोगांनी कहर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत तापाच्या साथीने तालुक्यात तोंड वर काढले असून शेकडो रुग्ण ताप, सर्दी, खोकला अंगदुखीने फणफणत आहेत. खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये सुध्दा रुग्णांची गर्दी वाढली आहे. टायफाईड, मलेरीया, डायरीया, हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून ग्रामीण भागातून वरुडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयातील बाहयरुग्ण विभागात ५०० च्या वर तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुध्दा दीडशे-दोनशे रुग्ण उपचाराकरिता येत आहेत. स्वाईन फ्लू संशयित रूग्णांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टॅमीफ्लू गोळया देण्यात येत आहेत. अशा स्थितीत नागपूरात उपचार घेणाऱ्या स्वाईन फ्लूने बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने वरुडमध्ये सद्यस्थितीत दहशतीचे वातावरण आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सरकारी व खासगी रूग्णालयांमध्ये टॅमीफ्लूच्या गोळयांचे ेमोफत वाटप सुरु करण्यात आले आहेत. ताप कोणत्याही प्रकारचा असला तरी आरोग्यकेंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)