वैभव बाबरेकर अमरावतीमुंबईत स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये रुग्णांसाठी विशेष कक्ष पुन्हा सज्ज करण्यात आला असून स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे.स्वाईन फ्लूचे एच१ एन१ हे विषाणू हवेच्या माध्यमातून पसरतात. त्यामुळे स्वाईन फ्लूवर नियंत्रणाच्या उपाययोजना आरोग्य विभागाने सुरु केल्या आहेत. काही महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील सहा जणांचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच शहरात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल २० रुग्ण पॉझिटीव्ह तर २ हजारांच्या जवळपास संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता पुन्हा स्वाईन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असून टॅमी फ्लू गोळ्याचा साठा पुरविण्यात आला आहे. तसेच थ्रोट स्वॅब घेण्याचे कीट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातच काही दिवसांतच आरोग्य विभागाकडून इर्विन प्रशासनाला व्हॅक्सिनचा पुरवठादेखील केला जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे इर्विनचा आढावा घेतला असून स्वाईन फ्लू व अन्य साथीच्या आजाराबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहेत.