स्वाईनची दहशत कायम, डेंग्यूला अर्धविराम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:34 IST2017-09-26T23:33:56+5:302017-09-26T23:34:35+5:30
महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संसर्गाचा धोका कायम आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे तूर्तास डेंग्यूला अर्धविराम मिळाला आहे.

स्वाईनची दहशत कायम, डेंग्यूला अर्धविराम !
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संसर्गाचा धोका कायम आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे तूर्तास डेंग्यूला अर्धविराम मिळाला आहे. १५ व १७ सप्टेंबरला केवल कॉलनी व बडनेºयाच्या माळीपुºयातील दोन वृद्ध महिलांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
२९ मार्च ते २५ सप्टेंबर या कालावधीत १४८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. पैकी १२७ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ३८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ९३ अहवाल स्वाईन निगेटिव्ह असून २१ स्वॅबचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळलेल्या गगलानीनगर येथील ५१ वर्षीय पुरुषाचा अकोला येथे १३ एप्रिलला, तर त्यापूर्वी विलासनगर येथील एका ४० वर्षीय महिलेचा इर्विनमध्ये ३० मार्चला मृत्यू झाला. त्यानंतर ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल व २९ एप्रिलला अनुक्रमे कपीलवस्तूनगर, फ्रेजरपुरा, रोशननगर आणि रुबानगर येथील २३ ते ६५ वर्षे वयोगटातील दोन महिला व दोन पुरूषांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला. त्यानंतर खोलापुरीगेट येथील एका ३० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात ५ मे रोजी मृत्यू झाला.
तत्पश्चात १ मे रोजी वृंदावन कॉलनी येथील ४८ वर्षीय इसमाचा बोंडे हॉस्पिटलमध्ये, तर रहाटगाव येथील ४५ वर्षीय महिलेचा नागपूर येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. चार महिने स्वाईन आटोक्यात आला, असे निरीक्षण नोंदविले जात असताना १५ सप्टेंबरला केवल कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा व १७ सप्टेंबरला माळीपुरा बडनेरा येथील ६४ वर्षीय स्त्रीचा पुन्हा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
२१ संशयित
स्वाईन फ्लू संशयित २१ जणांचे स्वॅब १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान तपासणीस पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. स्वाईन फ्लूच्या संशयितांमध्ये विलासनगर, मोतीनगर, दस्तुरनगर, अंबागेट, उत्तमनगर, दत्तविहार कॉलनी, मोतीनगर, समता कॉलनी, सौरभ कॉलनी, मेहेरदीप कॉलनी, राहुलनगर, मराठा कॉलनी, जुनीवस्ती, जयसियाराम नगर, शेगाव नाका, शामनगर, अंबाविहार, मोची गल्ली येथील रूग्णांचा समावेश आहे.
डेंग्यूचे सात पॉझिटिव्ह
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्यू संशयित ८६ रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळला तपासणीसाठी पाठविण्यात आले. सप्टेंबरमध्ये पाठविलेल्या ६६ पैकी ७ रक्तजल नमुने दूषित (पॉझिटिव्ह) आढळून आलेत. प्रभावी उपाययोजनांमुळे डेंग्यू आटोक्यात आला आहे. ४, ५, ६, ७ व १९ सप्टेंबरला पाठविलेले ७ रक्तजलनमुने पॉझिटिव्ह आढळून आले होते.