झेडपीच्या इमारत परिसराला गोडावूनचे स्वरूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:58+5:302021-03-07T04:12:58+5:30
दुर्लक्ष, सभागृहासह परिसरात भंगार साहित्य पडून अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध विभागांना अवकळा ...

झेडपीच्या इमारत परिसराला गोडावूनचे स्वरूप !
दुर्लक्ष, सभागृहासह परिसरात भंगार साहित्य पडून
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध विभागांना अवकळा आली आहे. यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे स्वच्छ झेडपीच्या इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही विभाग तर गोडाऊन बनल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणा नेमकी करते तरी काय, असा प्रश्न कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पडत आहे. जिल्हा परिषदेने सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून विविध गावांत स्वचछतेचे धडे दिले. यातून जिल्ह्यातील काही गावांचे उल्लेखनीय कार्याचे उदाहरण देवून स्वच्छता किती महत्त्वाची याचे गुणगाण केले जातात तसेच विविध कार्यालये जिल्हा परिषदेत असल्याने याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दी सतत दिसून येते. मात्र, अलीकडच्या काळात झेडपीतील विविध विभागांना अवकळा आली आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वच्छ जिल्हा परिषदेतच दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. प्रत्येक विभागाच्या मोकळा पॅसेजमध्ये जुनी कपाटे, खुर्च्या, टेबल व अन्य वस्तू ठेवल्या आहेत. त्या वस्तू पॅसेजच्या दोन्ही बाजूला ठेवण्यात आल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. मुख्यालयातील स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात साहित्य पडून आहे. सभागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारालगतसुध्दा खुर्च्या पडून आहेत. सोबतच महिला कक्षासमारे वापरण्यायोग्य खुर्च्या पडून आहेत. सोबतच वनविभागाच्या बाजूला असलेल्या प्रवेशाव्दारालगत केरकचरा साचला आहे. या सर्व अस्वच्छ ठिकाणी कुणाचेही स्वच्छतेबाबत लक्ष नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
बॉक्स
उद्यानाला झळाळी मात्र, अस्ताव्यस्त साहित्याचे काय?
एकीकडे जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या उद्यानाला झळाळी देण्याचे काम युद्धपातळीवर झाले आहे. असे असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सभागृहासह अन्य विभागांत समोरील मोकळ्या पॅसेजमध्ये साहित्य पडून आहे. मात्र, हे साहित्य बाजूला हटविण्याची साधी तसदीही यंत्रणेकडून घेतली नाही.