स्वप्नीलच्या स्वप्नांचा चुराडा
By Admin | Updated: November 6, 2014 22:47 IST2014-11-06T22:47:20+5:302014-11-06T22:47:20+5:30
वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत

स्वप्नीलच्या स्वप्नांचा चुराडा
हल्ल्यात सर्वस्व गेले : आताशा आयुष्याला मिळाली होती दिशा
अमरावती : वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत मी रमलो होते. बुधवारी अचानक हल्ला झाला नि काही कळायच्या आतच माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला.
यशोदानगर ते दस्तुरनगर रस्त्यावरील राणा कॉम्पलेक्सनजिक पानसेंटर चालविणारा तरुण स्वप्निल काळमेघ(२४) गुरुवारी फ्रेजरपुरा पोलीसठाण्यात आला होता. उद्धवस्त झालेल्या पानटपरीबाबत त्याला पोलिसांना वर्दी द्यायची होती. ठाण्याच्या बाहेर बसला असताना त्याच्या मनात माजलेले काहूर लक्षात आले. 'लोकमत'ने त्याच्याशी चर्चा केली. मनात दाटलेल्या भावना ज्वालामुखीप्रमाणे उफाळून येऊ लागल्या. शब्दांतून लढवय्य बाणा प्रतिबिंबित होत असतानाच अचानक त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यांना धारा लागल्या.
सावंगा या गावातील मूळचा रहिवाशी असलेला स्वप्नील तारुण्यातील अधिक काळ उनाडपणातच रमला. लग्नाचे वय झाले. तरीही जबाबदारीचे भान त्याला आलेले नव्हते. मारामाऱ्याही त्याच्यासाठी नवख्या नव्हत्या. आपल्यानंतर मुलाचे काय? मिळकत नाही, मुलगी मागायची कशी? अशी चिंता स्वप्निलच्या जन्मदात्रीला रोज छळत होती. या महागाईच्या जमान्यात एकटीनेच घराचा गाडा रेटणाऱ्या त्या माऊलीने गावातील तीन एकर शेतीवर कर्ज काढले. स्वप्निलला कुठलीही मदत न मागता तिनेच सारी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली. लाखभर रुपयांचे कर्ज मिळविले. स्वप्निलला छानसे पानसेंटर सुरू करून दिले. स्वप्निलचे मन रमेल, ग्राहकांनाही यायला प्रसन्न वाटेल, अशा आकर्षक पद्धतीने सजविलेल्या त्या पानसेंटरचे नाव स्वप्निलने 'एस.के. पॅलेस' असे ठेवले. दोन महिन्यांपासून त्याचा व्यवसाय नियमित आणि नफ्यात सुरू होता.