वनजमिनी गिळंकृत
By Admin | Updated: December 29, 2014 00:23 IST2014-12-29T00:23:11+5:302014-12-29T00:23:11+5:30
वनजमिनी कवडीमोल भावात विकण्याचा प्रकार उघडकीस येत नाही तोच वनजमिनीवरील होणारे अतिक्रमण धोक्याची घंटा ठरु लागली आहे.

वनजमिनी गिळंकृत
अमरावती : वनजमिनी कवडीमोल भावात विकण्याचा प्रकार उघडकीस येत नाही तोच वनजमिनीवरील होणारे अतिक्रमण धोक्याची घंटा ठरु लागली आहे. काही भागात धार्मिक स्थळे निर्माण करण्यात आल्याने वनजमिनीवर भविष्यात जाती, धर्माच्या भिंती तर उभ्या होणार नाही, अशी भिती वर्तवली जात आहे.
अमरावती वनविभागातंर्गत पाच वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनजमिनीवर अतिक्रमण वाढीस लागले असताना याप्रकरणी वरिष्ठ वनाधिकारी ते रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याचे वास्तव आहे. एकट्या वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत शहरालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.
हे अतिक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. मात्र वनजमिनीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी एकूणच वनविभाग कूचकामी ठरत आहे. वनजमिनीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. परंतु हे अतिक्रमण हटाव मोहीम पथक हल्ली ‘वसुली पथक’ ठरत आहे. शहरालगतच्या वनजमिनीवर कुडा-मातीच्या घरांसह स्लॅबची पक्की घरे निर्माण होत असताना वनाधिकारी हा प्रकार केव्हा थांबविणार, हा खरा सवाल आहे. वडाळी परिसरात वनजमिनीवर बिनधास्तपणे वीटभट्ट्या सुरु आहेत. एवढेच नव्हे तर वडरपुरा परिसरात वनजमिनीवर २० ते २५ पक्की घरे निर्माण करण्यात आली आहेत.
काही भागात धार्मिक स्थळे आकारास आली आहेत. वनजमिनीच्या हद्दीत स्लॅबची पक्क ी घरे निर्माण करेपर्यंत नागरिकांनी मजल गाठली असताना वनाधिकारी करतात काय, हादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वनजमिनी सुरक्षित ठेवण्यात अपशय येत असताना खरेच वनांचे संरक्षण होते काय, हा गंभीर प्रश्न आहे. वनजमिनीवर शहरातील घाण, केरकचरा आणून टाकला जात आहे. हळूहळू शहरालगतच्या वनजमिनी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
वनजमिनीवर अतिक्रमण करुन या जमिनींची परस्पर विक्री करणारी टोळीदेखील सक्रिय झाली आहे. ‘मसल पॉवर’च्या भरवशावर वनजमिनी ताब्यात घेणे, कालांतराने या वनजमिनी मर्जीनुसार विकणे हा या टोळीचा व्यवसाय झाला आहे. येथील आशियाना क्लब समोरील मार्गालगतच्या वनजमिनीवर अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण करण्यात आले आहे. वीटभट्ट्या, ट्रक थांबे, निवासी घरे साकारण्यात आली आहेत. येथील वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गालगतच वनजमिनीवर सर्रासपणे अतिक्रमण झाल्याचे आढळून येत आहे.
मंदिरे, दर्गा अन् बौद्ध विहारही साकारले
वनजमीन ही खासगी मालमत्ता असे समजून अनेकांनी वडाळी वनपरिक्षेत्रात राजरोसपणे मंदिरे, दर्गा आणि बौद्ध विहार साकारण्याची किमया केली आहे. ही धार्मिक स्थळे हटविण्याचा प्रसंग आला की, धार्मिक भावना दुखावण्याचे कारण पुढे करुन हे अतिक्रमण कसे कायम ठेवले जाईल, यासाठी वेळप्रसंगी वनाधिकाऱ्यांवर राजकीय दबावही आणला जातो. त्यामुळे वनजमिनीवर अतिक्रमण काढण्याऐवजी ते वाढीस लावण्यास अनेकांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे चित्र आहे.
दोन एकर वनजमिनीवर केली शेती
चांदूररेल्वे वनवर्तुळातील चिरोडी वर्तुळांतर्गत येणाऱ्या ब्रम्ही जंगलात काहींनी चक्क दोन एकर वनजमिनीवर शेती केल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे प्रकरण अंगलट येणार असल्याने चांदूर रेल्वेचे वनवर्तुळ अधिकारी गावंडे यांनी दोन एकर वनजमिनीवरील हे प्रकरण दाबण्याची तयारी चालविली आहे. हल्ली ही दोन एकर जमीन वनविभागाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र ज्या दोन एकर वनजमिनीवरील वृक्षतोड करण्यात आली, याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.