स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे वरुडात चक्काजाम
By Admin | Updated: November 2, 2015 00:30 IST2015-11-02T00:30:22+5:302015-11-02T00:30:22+5:30
मराठवाड्यात विद्यार्थ्यांना स्वाती अभय योजनेअंतर्गत शिक्षणासाठी मोफत बस पासेस देण्यात येते.

स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे वरुडात चक्काजाम
वरुड : मराठवाड्यात विद्यार्थ्यांना स्वाती अभय योजनेअंतर्गत शिक्षणासाठी मोफत बस पासेस देण्यात येते. याच धर्तीवर विदर्भातसुध्दा ही योजना लागू करुन शेतकरी, शेतमजूरांच्या पाल्यांना मोफत बसपास देण्याच्या मागणीकरीता स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भूयार यांच्या मार्गदर्शनात वरुड बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना एसटीची पास काढण्याची आर्थिक स्थिती राहिली नसल्याने अनेकांनी शिक्षणाला तिलांजली दिली. यामुळे शेतकरी, शेतमजूराच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येते. शेतकऱ्यांचा मुलगा महागडे शिक्षण घेवू शकणार की, नाही ही चिंता शेतकरी, शेतमजूरांना लागली आहे. शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, म्हणून शासनाने मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील भूमिपुत्रांच्या पाल्यांना मोफत एसटी पास योजना सुरु करावी, अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भूयार यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकाला निवेदन देवून वरुड बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करुन अर्धातास गाड्या थांबविल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर प्रवाशांना सुध्दा मन:स्ताप सहन करावा लागला.