स्वाभिमानने घेतली भाजपची विकेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:18 IST2021-08-18T04:18:17+5:302021-08-18T04:18:17+5:30

गजानन चोपडे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे ...

Swabhiman took BJP's wicket! | स्वाभिमानने घेतली भाजपची विकेट!

स्वाभिमानने घेतली भाजपची विकेट!

गजानन चोपडे

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पार गोची झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते येत आहेत, ही बाब स्थानिक नेत्यांना माहीत नसावी, याहून हास्यास्पद काही असूच शकत नाही. अमरावतीचे महापौर म्हणतात, माजी मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मला नव्हती. इतर नेत्यांनाही आपल्या नेत्याच्या या ‘सस्पेंस’ दौऱ्याबाबत कल्पना नसणे एकूणच भाजपसाठी चिंतनाचा विषय आहे. राजापेठ येथील भुयारी मार्गाचे लोकार्पण युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवि राणा यांनी आधीच उरकून टाकले. नंतर भाजपवाल्यांना जाग आली. म्हणे, आमच्या नेत्याला बोलावून या मार्गाचे पुन्हा लोकार्पण करण्यात येईल. झाले मात्र उलटेच. नेते आले; पण तेही रवि राणा यांच्या आमंत्रणावरून आणि फडणविसांची अमरावतीतील कालची एन्ट्री भाजपवाल्यांनाही माहीत नसावी, हे तर नवलच! काही दिवसांपूर्वी रवि राणा यांनी याच मार्गाचे लोकार्पण केले होते. त्यावेळी महापौर चेतन गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना या मार्गाचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द फडणवीसच राणा यांच्यासोबत असतील तर स्थानिक भाजपवाल्यांनी करायचे तरी काय, असा सवाल आता कार्यकर्ते आपल्या नेत्यांना विचारू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील राजकीय रसायन जरा अजब आहे. राज्यात खांद्याला खांदा लावून काम करणारे पक्ष स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. भाजपला सदैव साथ देणारा स्वाभिमान पक्षही या जिल्ह्यात भाजपला नकोसा आहे. अर्थात, केंद्रापासून तर राज्यातील नेतृत्वाला या पक्षाशी प्रेम असले तरी स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांना स्वाभिमानची ॲलर्जी आहे. असो, राणा मात्र आपल्या कामात मग्न आहेत, असे म्हणत राणा दाम्पत्याचे समर्थन करायचे, असे मुळीच नाही; पण पक्षश्रेष्ठींना जे आवडतात ते स्थानिक नेत्यांना का आवडत नाहीत, असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यात पिंगा घालत आहे. कालची घटनाही तशीच आहे. फडणवीस अमरावतीत राणांच्या निमंत्रणावरून येतात, तेही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना न सांगता. यातून एक बाब सिद्ध होते - ती म्हणजे, स्वाभिमानने स्थानिक भाजप नेतृत्वाची विकेट घेतली, तेही कुणाला न सांगता..!

Web Title: Swabhiman took BJP's wicket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.