सुवर्णकारांवर बेरोजगारीचे सावट
By Admin | Updated: September 15, 2015 00:12 IST2015-09-15T00:12:20+5:302015-09-15T00:12:20+5:30
सुवर्णकारांनी कलाकुसरीतून तयार केलेल्या दागदागिन्यांना महाराष्ट्रभरात वाढती मागणी आहे.

सुवर्णकारांवर बेरोजगारीचे सावट
५००च्यावर सुवर्णकार : मोठ्या शोरुमच्या आगमनाचा प्रभाव
अमरावती : सुवर्णकारांनी कलाकुसरीतून तयार केलेल्या दागदागिन्यांना महाराष्ट्रभरात वाढती मागणी आहे. मात्र, अलिकडे मोठमोठ्या शहरातील सुवर्णपेढ्यांच्या लखलखीत शो-रूम शहरात स्थापित झाल्यानंतर स्थानिक सुवर्णकारांनावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार तर शहरात ५०० च्या जवळपास सुवर्णकारागीर आहेत. मात्र, अलीकडे तयार दागिन्यांना अधिक पसंती मिळत असल्याने सुवर्ण कारागिरांना बेरोजगारीचे संकट भेडसावत आहे.
जिल्ह्यात दीडहजार सुवर्णकार असून त्याच्या माध्यमातून विविध सुवर्ण कारागिर कोट्यवधींचे सोन्याचे दागिने बनवीत आहे. सराफा बाजारात ४०० च्यावर छोटे-मोठे व्यवसायिक आहेत. दिवाळी- दसऱ्यासारख्या मोठ्या सणांमध्ये प्रत्येक दुकानदाराकडे खरेदीदारांची धूम असते. तसेच वर्षभर ग्राहक काही ना काही सोन्याची खरेदी करतात. सराफ्यातील छोटे व्यावसायिक सिझनमध्ये दरदिवसाला १ ते २५० ग्रॅमपर्यंत सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. मोठे व्यावसायिक १ ते अर्धा किलोपर्यंतच्या सोन्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक व्यवसायिकांकडे ५ ते १५ कारागीर आहेत. छोट्या दुकानांमध्ये कार्यरत कारागिरांना ३ ते ४ हजार रूपये वेतन दिले जाते. मोठ्या दुकानातील अथवा शोरूममधील कारागिरांना ५ ते १० हजार रूपयांपर्यंत वेतन दिले जाते. ही मोठी तफावत पाहायला मिळत आहे.
नथनीपासून मोठमोठ्या हारांपर्यंतचे विविध दागिने सुवर्णकार ग्राहकांसाठी तयार करतात. या व्यवसायातूनच जिल्ह्यात दीड हजार सुवर्णकार आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या कारागिरांचे सुगीचे दिवस ओसरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठया व्यापाऱ्यांनी पाय पसरल्यामुळे बहुतांश दागिने मशिनद्वारेच तयार करण्यात येत आहेत. राज्याबाहेरील सुवर्ण कागागीर अमरावतीत दाखल झाल्याने स्थानिक कारागिरांना घरी बसावे लागत आहे.
जळगाव, अमृतसर, मुंबईहून रेडिमड दागिने
अमरावतीत सोन्या-चांदीचे ८०० च्या जवळपास व्यापारी असून ते स्वत: दागिने तयार करतात. तसेच काही जण जळगाव, अमृतसर, मुंबई व अन्य काही मोठ्या शहरातून रेडिमेड दागिने बोलावितात. त्यामुळे अमरावतीही सुवर्ण कारागिरांच्या कामावर मोठ्या प्रभाव पडला आहे.
सर्वच दागिने रेडिमेड मिळत असल्यामुळे सुवर्णकारांकडील कामे सद्यस्थितीत फारच कमी झाली आहेत.