संशयास्पद मृत्यंूची आश्रमात मालिकाच!

By Admin | Updated: August 27, 2016 23:56 IST2016-08-27T23:56:44+5:302016-08-27T23:56:44+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या आश्रमात संशयास्पद मृत्यूंची मालिकाच घडली असल्याचा खळबळजनक ...

The suspicious death is a series of ashram! | संशयास्पद मृत्यंूची आश्रमात मालिकाच!

संशयास्पद मृत्यंूची आश्रमात मालिकाच!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा : तळघरात चालतात नरबळीच्या पूजा, सीबीआय चौकशीची मागणी
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या आश्रमात संशयास्पद मृत्यूंची मालिकाच घडली असल्याचा खळबळजनक आणि गंभीर दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिवारी येथे आयोजित एका पत्रपरिषदेत केला.
शोधकार्य करून समिती या निष्कर्षाप्रत पोहोचली असल्याचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला समितीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. बबन बेलसरे, विदर्भ संघटन सचिव मंगेश खेरडे, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, आर्वी तालुका संघटक प्रशांत नेपटे आदी मंडळी उपस्थित होती.

मुलीने घेतले जाळून
अमरावती : आश्रमातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या पचाडे नामक विद्यार्थ्याचा सहा महिन्यांपूर्वी अपमृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या अपघाती मृत्यूची नियमानुसार पोलिसात नोंद नसल्याची शंका समितीला आहे. या प्रकरणाचा हल्लकल्लोळ होऊ नये, यासाठी मुलाच्या मोठ्या भावाला नोकरीचे आमीष दिले गेले. चार-पाच महिने नोकरीवर ठेवल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. अपघाती मृत्यूचे संशयास्पद प्रकरण दाबण्यात आले.
दीड वर्षांपूर्वी बीएस. सी. अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजला शिकणारी एक मुलगी आश्रम परिसरात ५० टक्के भाजली. नंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचीही नोंद मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात नसल्याची शंका समितीने व्यक्त केली. पोलिसांनी या दोन्ही घटनांसंबंधीचे दस्तऐवज तपासून बघावे, असे मत समितीने व्यक्त केले.
वारंवार अशा घटना कशा घडतात? त्या दाबण्याचा आश्रमातील कर्तेधर्ते प्रयत्न का करतात? शंकर महाराज या घटनांपासून अनभिज्ञ असल्याचे कसे मान्य करावे? विद्यार्थ्यांच्या जीवाची अंतिम जबाबदारी शंकर महाराजांची नाही काय, असे सवाल समितीने उपस्थित केले.
आश्रम नव्हे, नातेवाईकांचा गोतावळा ?
आश्रम हा नोंदणीकृत ट्रस्ट असला तरी आश्रमातील कर्तेधर्ते कारभारी शंकर महाराजांच्या नात्यातील मंडळीच आहेत. बहुतेक ट्रस्टी बाहेरगावचे असल्याने रोजच्या कारभारावर महाराजांच्या नातेवाईकांची देखरेख आहे, अशी भुवया उंचावणारी तथ्ये समितीने सादर केली.
प्रथमेश नरबळी गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी शंकर महाराजांच्या भाच्याचा मुलगा आहे. मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे हा ज्याच्या अख्त्यारित कार्यरत होता, तो मेस इंचार्ज व मेस कंत्राटदार नाना बोंद्रे हा शंकर महाराजांचा भाचजावई आहे. रामभाऊ शिवणकर हा महाराज आणि इतर लोक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. आश्रमात महाराजानंतर हाच कर्ताधर्ता आहे. हा रामभाऊ शिवणकर आणि शंकर महाराज यांच्यात आतेभाऊ-मामेभाऊ असे नाते आहे. शाळेच्या मेसमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये अल्पवयीन आरोपीची काकू कार्यरत आहे. वसतिगृहाचा निलंबित अधीक्षक दिलीप मौजे हा रामभाऊ शिवणकर यांचा जावई आहे.
आश्रमानेच आणले सुरेंद्र मराठेला !
नाना बोंद्रे हा मेस कंत्राटदार व इंचार्ज आहे. चरण चटुले हा अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये इलेक्ट्रीशियनचे काम करतो. हे दोघे आणि इतर दोन शिक्षक वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथे राहणाऱ्या सुरेंद्र मराठे याला आश्रमातील शाळेत स्वयंपाकी काम करण्यासाठी ये अशी विनंती करायला त्याच्या गावी फेब्रुवारी महिन्यात गेले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याने बारा दिवस काम केले. अंतर्गत वादातून तो काम सोडून परत त्याच्या गावी गेला. जून महिन्यात पुन्हा चरण चटुले, नाना बोंद्रे व दोन शिक्षक सुरेंद्रच्या गावी गेलेत. आग्रह करून १८ हजार रुपये महिन्याने कामावर परत बोलविले. १५ जूनपासून सुरेंद्र कामावर रुजू झाला. काम सोडून गेलेल्या सुरेंद्रला फौजफाट्यानिशी जाऊन, तगड्या वेतनाचे आमीष देऊन परत बोलविण्याचे कारण काय, असा सवाल समितीने उपस्थित केला. प्रथमेशचा ७ आॅगस्ट रोजी गळा चिरल्यानंतर ८ आॅगस्ट रोजी चरण चटुले हा सुरेंद्रच्या मूळ गावातील घरी गेला. वडिलांकडून आधार कार्ड, राशन कार्डच्या झेरॉक्स आणि एटीएम कार्ड आणले. या भेटीदरम्यान चटुलेने आश्रमातील भयंकर घटनेबाबत अवाक्षरही त्याच्या वडिलांना सांगितले नाही. याप्रकरणी चटुलेने चुप्पी का साधली? कागदपत्रे इतक्या तातडीने का आणली, असे प्रश्न समितीने उपस्थित केले आहेत.
लाख मोलाचे प्रश्न
अजय वणवे व प्रथमेश सगणे यांच्यावर हल्ला होऊनही अपघात झाल्याचा बनाव आश्रम व्यवस्थापनाने का केला? पचाडे या विद्यार्थ्याचा अपमृत्यू का दाबला गेला? आश्रमच्या परिसरात विद्यार्थिनी पन्नास टक्के जळते कशी? दोन नरबळी प्रयत्नांच्या चौकशीसोबतच आधीच्या अपमृत्यूंची चौकशी पोलिसांनी का केली नाही? आश्रमातील कारभारी, व्यवस्थापन, कर्मचारी सर्वच महाराजांच्या नात्यातले आहेत. त्यामुळे सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजय वणवे, प्रथमेश सगणे हल्ल्याप्रकरणी दिलीप मौजे, नाना बोंद्रे, चरण चटुले, आश्रमात दोन-दोन महिने मुक्काम ठोकणारा नागपूरचा राजू भोगे, रामभाऊ शिवणकर आणि शाळेतील दोन शिक्षक यांचे वर्तन अत्यंत संशयास्पद आहे. त्यांची चौकशी पोलिसांनी का केली नाही, असे परखड सवाल समितीने उपस्थित केले.

समितीच्या या आहेत मागण्या
आश्रमातील रामभाऊ शिवणकर, नाना बोंद्रे, राजू भोगे, चरण चटुले आणि शाळेतील दोन शिक्षकांची विनाविलंब कसून चौकशी पोलिसांनी करावी, आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, शंकर महाराज आश्रमाला मिळणाऱ्या लाखो रुपयांची देणगी व आश्रमाच्या अफाट संपत्तीची चौकशी अंमलबजावणी संचालनालयामार्फत करण्यात यावी, अजय वणवे व प्रथमेश सगणे यांच्या उपचाराची व शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, तमाम अपप्रकरणांची जबाबदारी अंतिमत: ज्यांच्या शिरावर येते त्या शंकर महाराजांची चौकशी करण्यात यावी आणि स्थानिक पोलीस सुरुवातीपासून संशयास्पद भूमिकेत असल्याने या हायप्रोफाईल प्रकरणाची चौकशी विनाविलंब सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशा मागण्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केल्या आहेत.

नरबळीसाठी आश्रमात पोषक वातावरण
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात नरबळीला पोषक वातावरण असल्याचा महत्त्वपूर्ण दावा अंनिसने केला आहे. आश्रमात एक तळघर आहे. या तळघरात महाराजांशिवाय इतर कोणालाही जाण्याची परवानगी नाही. तळघरात नरबळी संबंधीच्या विविध पूजा आणि विधी पार पडतात, असा गौप्यस्फोट गणेश हलकारे यांनी केला.

Web Title: The suspicious death is a series of ashram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.