महेंद्री जंगलात नर बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:18 PM2020-12-22T22:18:06+5:302020-12-22T22:18:25+5:30

वरूडनजीक शेकदरी-गव्हाणकुंड वन बीटमधील घटना, पशुवैद्यकीय चमूकडून पंचनामा

Suspicious death of male leopard in Mahendra forest | महेंद्री जंगलात नर बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

महेंद्री जंगलात नर बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

Next

अमरावती : महेंद्री जंगलात चार ते पाच वर्षाचा नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याचे वरूडनजीक शेकदरी-गव्हाणकुंड वन बीटमध्ये मंगळवारी दुपारी २ नंतर उघडकीस आले. बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की विषप्रयोगाने मारले, याबाबत सुस्पष्टता होऊ शकली नाही. उशिरा सायंकाळपर्यंत मृत बिबट्याचे शवविच्छेदन झाले नव्हते, अशी माहिती आहे.

वरूडनजीक शेकदरी-गव्हाणकुंड वन बीटमध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच वनविभागात धावाधाव सुरू झाली. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन् बाला यांनी सहायक वनसंरक्षक लीना आदे यांना घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट्याचा अंगावर जखमा आढळून आल्या असून, झाडावरून पडल्याने तो दगावला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मात्र, बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. वनमंत्री संजय राठाेड हे मंगळवारी अमरावती दौऱ्यावर असताना बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली.
 


बिबट्याचे बुधवारी होणार शवविच्छेदन

महेंद्री जंगल परिसरात पशुवैद्यकीय चमूने मंगळवारी केवळ घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने दिवसा शवविच्छेदन करावे, अशी मागणी वन्यजीव रक्षकांकडून करण्यात आली. त्यामुळे बुधवारी शवविच्छेदन होणार आहे.
 


शेकदरी-गव्हाणकुंड वन बीटमध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. सहायक वनसंरक्षक लीना आदे यांच्याकडे घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाची जबाबदारी सोपविली आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, यासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल अप्राप्त आहे.

- चंद्रशेखरन् बाला, उपवनसंरक्षक, अमरावती.


घटनास्थळावर प्रथमदर्शनी बिबट्याच्या शरीरावर तीन जखमा आढळून आल्या. हा अपघात नव्हे, घातपात आहे. विषप्रयोगानंतर बिबट्यावर कुऱ्हाडीचे वार केल्याचे दिसून येते. मागील पायावर आणि कमरेवरही जखमा आहेत.

- सावन देशमुख, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती.

Web Title: Suspicious death of male leopard in Mahendra forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.