मोर्शी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती
By Admin | Updated: December 9, 2015 00:16 IST2015-12-09T00:16:46+5:302015-12-09T00:16:46+5:30
नगराध्यक्षाच्या होऊ घातलेल्या ११ तारखेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असून याप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मोर्शी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती
स्थिती कायम : नागपूर खंडपीठाचा निर्णय
मोर्शी : नगराध्यक्षाच्या होऊ घातलेल्या ११ तारखेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असून याप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतिभा कटीस्कर यांना नगर विकास राज्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे पदावरुन कमी केले. पुढील सहा वर्षापर्यंत त्यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीला प्रतिबंध घातला होता. शासनादेश प्राप्त झाल्यावर नगराध्यक्षा प्रतिभा कटीस्कर पायउतार झाल्यात. त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार तहसीलदार अनिरुध्द बक्षी यांनी स्वीकारला. इकडे सत्तारुढ गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे राज्यमंत्र्याच्या आदेशाविरुध्द याचिका दाखल करुन आदेश रद्द ठरविण्याची विनंती केली होती. याप्रकरणी १४ डिसेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निर्धारित करण्यात आलेली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्षाच्या रिक्तजागेसाठी निवडणूक जाहीर केली. तशा सूचना नगर सेवकांना दिल्या होत्या. हे पाहता सत्तारुढ गटाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे दाखल याचिके प्रकरणी तातडीची सुनावणी करण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर ला या प्रकरणी सुनावणी ठेवली होती. याचिकाकर्त्या प्रतिभा कटीस्कर यांच्या वतीने एम व्ही. समर्थ, शासनाच्यावतीने भारती डांगरे यांनी तर नगरसेविका वंदना बोरकर यांच्यावतीने एस. एम. वैष्णव यांनी बाजू मांडली. शासनाचे वकील भारती डांगरे यांनी ८ डिसेंबरपर्यंत शासनाची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला.