केरोसीनच्या अनुदान प्रक्रियेला स्थगिती
By Admin | Updated: April 6, 2016 00:02 IST2016-04-06T00:02:34+5:302016-04-06T00:02:34+5:30
आधार कार्ड लिंक करून १ एप्रिल २०१६ पासून तालुक्यातील रेशनकार्डधारकांना मिळणारे केरोसीनचे अनुदान त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार होते.

केरोसीनच्या अनुदान प्रक्रियेला स्थगिती
पूर्वीच्याच पद्धतीने वाटप :२२ हजार ग्राहक लाभापासून वंचित
चांदूरबाजार : आधार कार्ड लिंक करून १ एप्रिल २०१६ पासून तालुक्यातील रेशनकार्डधारकांना मिळणारे केरोसीनचे अनुदान त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार होते. परंतु नियोजित कालावधीत आधारकार्ड, बँकखाते व एलपीजी गॅस धारकांच्या माहितीचे संकलन न होऊ शकल्याने तालुक्यातील केरोसिनचे अनुदान सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.
केरोसीन अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्याच्या पाहणीनुसार तालुक्यात ३१ मार्च २०१६ पर्यंत कार्डधारकांची संख्या ४५ हजार ६७९ इतकी आहे. याची केरोसीन वितरणासाठी महसूूल विभागाने ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र अशी विभागणी केली आहे. ग्रामीणमध्ये ४२ हजार ७५ तर नगरपालिका क्षेत्रात ३ हजार ६०४ रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. यासर्व कार्डधारकांची पुुन्हा वर्गवारी करण्यात आली असूून ग्रामीण क्षेत्रात एपीएल ११ हजार तर नगरपालिका क्षेत्रात एपीएल प्राधान्यगट ९०८, शेतकरी एपीएल ९६९, बीपील १ हजार १४०, शुभ्र २१३, अंत्योदय ३७४ अशी वर्गवारी महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. शासनाच्या नवीन केरोसीन वितरण धोरणानुसार, केरोसीनच्या विगतवारीनिहाय केरोसीनची मागणी तालुक्यासाठी करण्यात आली आहे. ही मागणी करताना तालुक्यातील २२ हजार ७५ एलपीजी गॅसधारकांना केरोसीन वाटपामधून वगळण्यात आले आहे. यात एक व दोन गॅस सिलिंडरधारकांचा समावेश आहे. यात ग्रामीण क्षेत्रातील १९ हजार ८१३ तर नगरपालिकाक्षेत्रातील २ हजार २६२ गॅसधारकांचा समावेश आहे.
परिणामी आजच्या घटकेला तरी तालुक्याच्या केरोसीन मागणीत २९ हजार १२६ लिटरने केरोसीनच्या मागणीत घट झाली आहे. याआधी तालुक्याला १ लाख १६ हजार ३२८ किलो लिटर केरोसीन महिन्याकाठी प्राप्त होत होते. याचे वाटप तालुक्यात सहा ठोक व १०२ चिल्लर विक्रेत्यांमार्फत केले जात होते. एप्रिल महिन्याकाठी महसूल विभागाकडून केरोसीनच्या विगतवारी नुसार नवीन धोरणाप्रमाणे गॅसधारक वगळून ८७ हजार २०२ किलो लिटर केरोसीनची मागणी करण्यात आली आहे. हे केरोसीन प्राप्त होताच उपरोक्त वितरण व्यवस्थेव्दारे ग्रामीण व शहरी भागातील कार्डधारकांपर्यंत तो पोहोचविण्यात येणार आहे. केरोसीनवाटप शहरी व ग्रामीण क्षेत्रासाठी सारखेच राहाणार आहे. १ व्यक्ती २ लिटर, २ व्यक्ती ३ लिटर, ३ व्यक्ती ४ लिटर असे केरोसीन कार्डवर्गवारीनुसार कार्डधारकांना मिळणार आहे.
शासनाने दिलेल्या कालावधीत कार्डधारकांची आधारकार्ड व बँक माहिती व गॅस कनेक्शन माहिती गोळा होऊ शकली नाही. त्यामुळे खात्यात अनुदान जमा करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांसाठी तालुक्याला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार केरोसीन वाटप होणार असून केरोसीनच्या मागणीत संपूर्ण आकडेवारी जुळल्यानंतर बदल होऊ शकतो.
- रुपाली सोळंके,
तालुका पुुरवठा निरीक्षक, चांदूरबाजार