टंचाईत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती
By Admin | Updated: November 29, 2014 23:14 IST2014-11-29T23:14:28+5:302014-11-29T23:14:28+5:30
अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह

टंचाईत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती
जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे : चार लाख ५४ हजार शेतकऱ्यांना लाभ
अमरावती : अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह अमरावती जिल्ह्यातील १९८६ गावे व ४ लाख ५३ हजार ९६४ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पावसाअभावी राज्यातील विविध भागांत खरीप पिके हातून गेली. उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या राज्यातील सहा विभागांतील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९८६ गावांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यास आलेल्या आहेत. या सवलतींमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेतून दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)