सफाई कामगार दाम्पत्य बडतर्फ, एसआय निलंबित
By Admin | Updated: March 11, 2017 00:06 IST2017-03-11T00:06:45+5:302017-03-11T00:06:45+5:30
महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या छाया गणेश ढेणवाल व गणेश प्रेम ढेणवाल या सफाई कामगार दाम्पत्याला महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

सफाई कामगार दाम्पत्य बडतर्फ, एसआय निलंबित
महापालिका आयुक्तांची कारवाई : स्वच्छ भारत अभियानाला खो दिल्याचा ठपका
अमरावती : महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या छाया गणेश ढेणवाल व गणेश प्रेम ढेणवाल या सफाई कामगार दाम्पत्याला महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच आयुक्तांनी स्वास्थ निरीक्षक एस.एस.घेंगट याला निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश पारित केले.
यापूर्वी या दामत्याला महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. प्रेम बारी ढेणवाल व लक्ष्मी पे्रम ढेणवाल हे पती-पत्नी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांना सेवानिवृत्ती पश्चात पेन्शन अदा करण्यात येत होती. मात्र, या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबतची कुठलीही माहिती गणेश पे्रम ढेणवाल व छाया गणेश ढेणवाल यांनी महापालिकेला दिली नाही व त्यानंतर या दोघांनी संगनमत करुन पे्रम व लक्ष्मी ढेणवाल हे जीवंत असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र देऊन बँकेतून ४ लाख ९ हजार १८० रुपये पेन्शन म्हणून घेतले. दोन वर्षापर्यंत हा गोरखधंदा सुरु राहिला. याबाबत शहर कोतवाली पोलिसांमध्ये आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आणि दोघांनीही महापालिका सेवेतून निलंबि करण्यात आले. त्यानंतर ४ मार्चला एक आदेश काढून गणेश प्रेम ढेणवाल व छाया प्रेम ढेणवाल या दाम्पत्याला महापालिका सेवेतून बडतर्फे करण्यात आले. अपहाराची रक्कम त्यांना देय असलेल्या रकमेतून कपात केली जाईल.
ओडीएफला फाटा, घेंगटवर कारवाई
वैयक्तिक शौचालय उभारणीला फाटा दिल्याप्रकरणी नेमाणी गोडावून प्रभागात कार्यरत असलेले स्वास्थ्य निरीक्षक एस.ए.घेंगट यांना १० मार्चला निलंबित करण्यात आले आहे. स्थानांतरणाबाबत कार्यभार सोपविताना घेंगट यांनी कार्यभार व प्रलंबित कामाची माहिती वरिष्ठांना दिलेली नाही. याशिवाय ते परिपूर्ण माहिती व प्रमाणपत्राविना अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या परिसरातील कामे प्रलंबित राहिली. ही बाब कार्यालयीन शिस्तीच्याविरुध्द असल्यामुळे आयुक्तांनी त्यांना निलंबित केले.