निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: May 29, 2016 00:23 IST2016-05-29T00:23:10+5:302016-05-29T00:23:10+5:30

तेरा महिन्यांची डेअरडॅशिंग कारकिर्द गाजवून मंत्रालयात गेलेल्या चंद्रकांत गुडेवारांनंतर मनपा पदाधिकाऱ्यांना निधीसाठी झगडावे लागत आहे.

Suspended officers, employees 'good days' | निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

आयुक्त सकारात्मक : निलंबन आढावा समिती
अमरावती : तेरा महिन्यांची डेअरडॅशिंग कारकिर्द गाजवून मंत्रालयात गेलेल्या चंद्रकांत गुडेवारांनंतर मनपा पदाधिकाऱ्यांना निधीसाठी झगडावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांची निधीसाठी ओढाताण सुरू असताना निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत.
तत्कालिन आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि त्या आधीच्या आयुक्तांच्या कार्यकाळात निलंबित झालेल्यांच्या फाईलवरील धुळ झटकल्या गेली आहे. नवनियुक्त आयुक्त हेमंत पवार यांनी आल्याआल्याच या निलंबितांना सेवेत पूर्ववत करण्याबाबतचा सुखद धक्का दिला आहे. निलंबितांना आर्थिक दंड ठोठावून त्यांना सेवेत पूर्ववत करण्याच्या दृष्टीने उपायुक्त (सामान्य प्रशासन) विनायक औगड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय निलंबन आढावा समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती निलंबित प्रकरणांचा आढावा घेवून अंतिम अहवाल आयुक्तांना सादर केल व त्यानंतर कुठली शिक्षा करून निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पूर्ववत करावे, याचा अंतिम निर्णय आयुक्त घेतील. डोंगरेंच्या कार्यकाळाच्या तुलनेत चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कार्यकाळात सर्वाधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.
याशिवाय प्रशासकीय कारवाईसह वेतनवाढ रोखण्याचा बडगाही उगारण्यात आला होता. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर पवारांच्या निलंबन आढाव्याचे निर्णयाने हास्याची लकेर उमटली आहे.
जून २०१४ ते मे २०१६ या दोन वर्षाच्या कालावधीत क्लास टू च्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अमरावती मनपाने निलंबित केलेल्या सहाय्यक आयुक्त सुषमा मकेश्वर यांना शासनाने बडतर्फ केले आहे. याशिवाय वर्ग ३ चे आठ व वर्ग ४ चे चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

हे आहेत निलंबित कर्मचारी-अधिकारी
स्वच्छता विभागातील वैद्यकीय अधिकारी देवेंद्र गुल्हाने, पशुशल्य विभागातील पशूशल्य अधिकारी सुधीर गावंडे, तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुषमा मकेश्वर, कनिष्ठ लिपीक सचिन कनोजे, ज्ञानेश्वर झोंबाडे, झोन अभियंता लक्ष्मण पावडे, वाहन चालक संदीप सोनोने, मुख्याध्यापिका विना लव्हाळे, कनिष्ठ लिपीक संजय वडूरकर, कनिष्ठ लिपीक अनुप सारवान, सहाय्यक शिक्षक योगेश पखाले, सहाय्यक प्रोग्रामर सचिन पोपटकर यांच्यासह वर्ग ४ मधील कुली यशवंत नंदलाल पटेल, गणेश प्रेम ढेणवाल, छाया गणेश ढेणवाल, सफाई कामगार रवि सारसर आणि शिपाई राजेंद्र मेश्राम.

दोन निलंबितांची पुनर्स्थापना
शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपीक सविता पाटील आणि मनपा उर्दू शाळा आयएम स्कूलच्या मुख्याध्यापिका जहाआरा बेगम या उभय निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. अवघ्या एक आणि तीन महिन्यात त्यांना पुनर्स्थापित करण्यात आले.

Web Title: Suspended officers, employees 'good days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.