डेपो मॅनेजरसह निरीक्षक निलंबित

By Admin | Updated: March 16, 2017 00:04 IST2017-03-16T00:04:05+5:302017-03-16T00:04:05+5:30

येथील आगार व्यवस्थापकासह सहायक निरीक्षकाने बसगाड्यांच्या किलोमीटरच्या घेतलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत आढळून आल्याने ...

Suspended inspector with Depot Manager | डेपो मॅनेजरसह निरीक्षक निलंबित

डेपो मॅनेजरसह निरीक्षक निलंबित

किलोमीटरमध्ये तफावत : विभागीय नियंत्रकांची कारवाई
परतवाडा : येथील आगार व्यवस्थापकासह सहायक निरीक्षकाने बसगाड्यांच्या किलोमीटरच्या घेतलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत आढळून आल्याने विभागीय नियंत्रकांनी दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे. मात्र, आठवडा लोटूनही ही माहिती पूर्णत: गुप्त ठेवण्यात आली, हे विशेष.
परतवाड्याचे आगार व्यवस्थापक अनंत ताठर व सहायक निरीक्षक नीलेश मोकळकर अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. ७ मार्च रोजी अमरावती विभागीय व्यवस्थापक राजेश अडोकार यांनी ही कारवाई केली. यामुळे परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात खळबळ उडाली आहे. परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परतवाडा ते अकोलापर्यंत धावणाऱ्या बसफेरीला अकोल्यापर्यंत जाऊ न देता अकोट पर्यंतच सोडण्यात आले व रजिस्टरवर नोंदी घेताना मात्र ही बसफेरी परतवाडा ते अकोला म्हणजे १२० किलोमीटर धावल्याचे दाखविण्यात आले.
ठाकरेंकडे पदभार
परतवाडा : रजिस्टरच्या तपासणीदरम्यान नोंदींमधील ही तफावत आढळून आल्याने उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठ्या परतवाडा आगारात इतरही अनेक त्रुटी आढळून आल्यात. अनंत ताठर यांना ७ मार्च रोजी निलंबित केल्यावर १० मार्च रोजी अमरावती येथून प्रभारी व्यवस्थापक म्हणून वाय.एम. ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वाहतूक निरीक्षकाची अद्याप नियुक्ती व्हायची आहे. (तालुका प्रतिनिधी)

कारवाईबाबत कमालीची गुप्तता
दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी माहिती देण्याचे टाळले. मात्र, नंतर थोडक्यात माहिती देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. सोबत लवकरच त्यांना कामावर घेण्याची पुष्टी जोडली हे विशेष.

या प्रकरणासंदर्भात कोणतीच माहिती नाही. परतवाडा आगारातील कारभारात कुठलीच अडचण येऊ नये त्यासाठी १० मार्च रोजी येथे पाठविण्यात आले. आदेशानुसार पदभार स्वीकारला आहे.
- वाय.एम.ठाकरे
प्रभारी आगार व्यवस्थापक, परतवाडा

संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी बसफेरीच्या किलोमीटरमध्ये घेतलेल्या नोंदीत तफावत आढळून आली. इतरही काही त्रुटी आढळल्याने दोघांना ७ मार्च रोजी निलंबित केले.
- राजेश अडोकार
विभागीय नियंत्रक
परिवहन महामंडळ, अमरावती.

Web Title: Suspended inspector with Depot Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.