एएसआयसह शिपाई निलंबित
By Admin | Updated: November 7, 2016 00:09 IST2016-11-07T00:09:41+5:302016-11-07T00:09:41+5:30
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वाहतूक शाखेतील एएसआयसह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

एएसआयसह शिपाई निलंबित
छायाचित्र बोलले : बसस्थानक चौकातील वाहतूक कोंडी
अमरावती : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वाहतूक शाखेतील एएसआयसह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
‘वाहतूक नियोजन आहे तरी कुठे?’ अशा शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ५ नोव्हेंबरच्या अंकात बसस्थानक चौकातील वाहतूक कोंडीचे बोलके छायाचित्र प्रकाशित केले होते. या छायाचित्राच्या आधारे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी उशिरा रात्री बसस्थानक चौकात शुक्रवारी कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक उमेश राठोड व पोलीस शिपाई सतीश महल्ले अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते ४ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते १० वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणासाठी बसस्थानक परिसरात तैनात होते. ४ नोव्हेंबरला बसस्थानाकसमोर एसटी, आॅटोरिक्षा व अन्य खासगी वाहनांंसह फेरीवाल्यांची विचित्र कोंडी निर्माण झाली होती. कुठले वाहन कुठून येतेय आणि कुठे चाललेय, हेच कळत नव्हते. नेमका तोप्रसंग ‘लोकमत’च्या छायाचित्रकाराने टिपला त्याअनुषंगाने या स्थितीसाठी जबाबदार धरून उपरोक्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले (प्रतिनिधी)
पोलिसांची प्रतिमा डागळण्यास कारणीभूत
मासिक गुन्हे परिषद आणि अन्य बैठकीच्यावेळी सर्व संबंधित वाहतूक पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांना शहरातील वाहतूक नियमनासाठी लेखी व तोंडी सूचना दिल्यात. मात्र, तरीही आपण आदेश आणि सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा करून कसूर केला. ‘लोकमत’मधील प्रकाशित छायाचित्रामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा डागाळण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका महल्ले व राठोड यांच्यावर आयुक्तांनी ठेवला आहे.