संशयित कोरोनासंक्रमित महिलेचा झोपडीतच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:33+5:302021-02-26T04:18:33+5:30
अनिल कडू परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत गडकी गावातील एका संशयित कोरोना संक्रमित महिलेचा औषधोपचाराविनाच झोपडीत दुर्देवी मृत्यू ...

संशयित कोरोनासंक्रमित महिलेचा झोपडीतच मृत्यू
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत गडकी गावातील एका संशयित कोरोना संक्रमित महिलेचा औषधोपचाराविनाच झोपडीत दुर्देवी मृत्यू झाला. मनकाय दहिकर (६८, रा. औरंगपुरा, गडकी) असे मृताचे नाव असून, २३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. मृत्यू समयी ती एकटीच घरी होती.
मनकाय ही अचलपूर पंचायत समितीच्या कार्यालयालगत बी.एस.पाटील महाविद्यालय परतवाडा समोरील एका घरी घरकाम करायची. या घरी ती कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आली. त्या कोरोना संक्रमित रुग्णाची तिने सेवाही केली. दरम्यान तिची प्रकृती बिघडली. ताप, खोकला, सर्दी आणि श्वासोच्छावासास तिला त्रास होत असताना ती २२ फेब्रुवारीला उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोहचली. तिने तेथे ओपीडी कार्डही काढले. यात तिला कुटीर रुग्णालयात जाऊन रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करायला सांगितले.
ती कुटीर रुग्णालयातही पोहचली. तेथे तिला काहीच सुचले नाही. कुणाकडूनही तिला संदर्भ सेवा उपलब्ध झाली नाही. ती तेथून सरळ गडंकी (औरंगपूर) येथील आपल्या झोपडीत परतली. माहिती मिळताच एएनएम के.एस.टेकाम व गावातील आशा वर्करने २३ फेब्रुवारीला त्या महिलेशी संवाद साधला. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्या महिलेला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पण नातेवाईकांनी थोडावेळ मागितला. यातच अखेर २३ फेब्रुवारीला रात्री उशिरा त्या महिलेची प्राणज्योत मालवली. २४ फेब्रुवारीला तिच्या मोजक्याच नातेवाईकांनी पार्थिवावर अंतिम संस्कार केले.
गडकी (औरंगपुरा) गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या घटनेनंतर त्या संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण केल्या गेले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार की कसे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. खरे तर ती महिला गंभीर आजारी असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयानेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या किटच्या मदतीने या महिलेची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करायला हवी होती. किंवा त्या महिलेला तेथूनच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेतून कुटीर रुग्णालयात पाठवायला हवे होते. पण तसे झाले नाही. दरम्यान आरोग्य विभागाच्या किंवा राजस्वविभागाच्या कुठल्याही बड्या अधिकाऱ्यांनी वृत्तलिहिस्तोवर गडकी (औरंगपुराला)भेट दिलेली नाही.
कोट
गडकी (औरंगपुरा) येथील त्या महिलेच्या मृत्यूनंतर गावात निर्जतुकीकरण करण्यात आले आहे.
विनोद मोरे, ग्रामविकास अधिकारी, गौरखेडा कुंभी
कोट
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ती महिला मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूपूर्वी त्या महिलेची कोरोना चाचणी झालेली नाही.
- के.एस.टेकाम, परिचारिका, गौरखेडा कुंभी