सूर्यगंगा नदीपात्राने घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: June 28, 2016 00:11 IST2016-06-28T00:11:59+5:302016-06-28T00:11:59+5:30
तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीपात्राचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.

सूर्यगंगा नदीपात्राने घेतला मोकळा श्वास
तिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीपात्राचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे सूर्यगंगा नदीपात्राने मोकळा श्वास घेतला आहे.
काही वर्षांपासून सूर्यगंगा नदीपात्रामध्ये केरकचरा व गाळ साचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन या नदीची अवस्था बिकट झाली होती. तसेच पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वस्तीत व शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. मात्र यापूर्वी या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नसल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. याबाबत या परिसरातील नागरिक व शेतकरी यांनी ही वस्तुस्थिती आ. यशोमती ठाकूर यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याची फलश्रृती म्हणून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू होऊन पूर्णत्वाकडे गेले. या कामाला नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन आ. यशोमती ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला.
या कामासाठी गरज पडल्यास आणखी निधी मंजूर करण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सरपंच सागर बोडखे, दीपक सावरकर, किरण चौधरी, किशोर चौधरी, वामनराव भोजने, जितेंद्र ठाकूर, ग्रा. पं. सदस्य संजय चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता क्षीरसागर, नरेंद्र आसोडे, बाळू घुरडे, विनोद ओलवीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)