दिवाळीत अंध-अपंगांसाठी पुरणपोळीचा बेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 21:54 IST2017-10-16T21:54:11+5:302017-10-16T21:54:27+5:30
शहरात दीनदुबळ्यांना सणासुदीला गोडधोड खाऊ घालणाºया विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजीपोळी केंद्रात येत्या दिवाळीला दोन दिवस पुरणपोळीचा बेत आखला आहे.

दिवाळीत अंध-अपंगांसाठी पुरणपोळीचा बेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात दीनदुबळ्यांना सणासुदीला गोडधोड खाऊ घालणाºया विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजीपोळी केंद्रात येत्या दिवाळीला दोन दिवस पुरणपोळीचा बेत आखला आहे. १७ व १८ रोजी भाजीपोळी केंद्रात शहरातील अपंगांना मोफत पुरणपोळीचे भोजन दिले जाणार आहे. २८ वर्षांपासून विठ्ठलरावांचे भाजीपोळी केंद्र सुरू आहे. या माध्यमातून त्यांची सेवा अखंड सुरू आहे. राष्टÑीय सणांना शहरातील अंध-अपंगांना पक्वान्नाचे भोजन ते देतात. त्यात एकदाही खंड पडला नाही.
या उपक्रमाव्यतिरिक्त शहरातील रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाच रूपयात तीन पोळ्या, वाटीभर भाजी व वरण देण्याचा त्यांचा नित्योपक्रम आहे. अंबागेटच्या आत एका १० बाय १० च्या खोलीत त्यांचे हे भाजीपोळी केंद्र सुरू आहे. बालपणी आपल्या वाट्याला आलेले वाईट दिवस इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, अंध-अपंगांनाही सणासुदीला गोड घास मिळावेत. या उद्देशाने त्यांनी हे केंद्र सुरू केले आहे. जुना कॉटन मार्केट परिसरात हातगाडीवर गॅस वेल्डींगचा व्यवसाय करून त्यातील मिळकतीवर ते हे भाजीपोळी केंद्र चालवितात. अन्न यज्ञाच्या माध्यमातून समाजाची अखंड सेवा करणाºया विठ्ठलरावांच्या कार्याला तोड नाही.