युवा सेनेच्या आंदोलनाला ‘राणा लँडमार्क’ पीडितांचे समर्थन
By Admin | Updated: January 29, 2015 22:58 IST2015-01-29T22:58:39+5:302015-01-29T22:58:39+5:30
शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या उपोषणाला गुरुवारी राणा लँडमार्क प्रकरणातील पीडित नागरिकांनी पाठिंबा दिला.

युवा सेनेच्या आंदोलनाला ‘राणा लँडमार्क’ पीडितांचे समर्थन
अमरावती : शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या उपोषणाला गुरुवारी राणा लँडमार्क प्रकरणातील पीडित नागरिकांनी पाठिंबा दिला. उपोषण मंडपात त्यांनी दिवसभर ठिय्या दिला. यात महिलांचाही समावेश होता.
घरकुलाचे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क्स प्रा. लि.च्या संचालकांना पसार होण्याची संधी देणारे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांना सेवेतून बरखास्त करावे आणि चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन गुंतवणूकदारांनी सायंकाळी गृहराज्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
गुंतवणूकदारांचा फसवणुकीचा आरोप
शहरात फ्लॅट्स व प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राणा लॅन्डमार्क्स प्रा. लि. या कंपनीने सुमारे ९६१ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ४१६ तक्रारी दाखल आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी आमच्याकडून रोख रक्कम घेऊन योगेश राणा यांच्या सह्यांचे इसारचिठ्ठ्यांचे मुद्रांक देणारा चंद्रशेखर राणा याला आरोपी करण्याऐवजी त्याला फरार होण्याची संधी दिली. चंद्रशेखर राणा, योगेश राणा व इतर संचालकांची मालमत्ता जप्त करण्याबाबत जाणूनबुजून दिरंगाई केली असे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांची अणे यांच्याबाबतची भूमिका संयशास्पद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ३१ जणांच्या सह्या असलेल्या या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांनाही उल्लेखित करण्यात आल्या आहेत.