उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे वाटोळे
By Admin | Updated: May 16, 2016 00:05 IST2016-05-16T00:05:24+5:302016-05-16T00:05:24+5:30
दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा ...

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे वाटोळे
पोषण आहारासाठी धान्य पुरवठा नाही : विद्यार्थ्यांचीही दांडी
जितेंद्र दखने अमरावती
दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा म्हणून शिक्षण विभागाने १६ एप्रिल ते १४ जून दरम्यान ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांमध्ये खिचडी व इतर मेनू दररोज शिजवून वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र सुट्यांमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हिच बाब शिक्षकांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळेत आणून तांदळाची खिचडी द्यावी, असा फतवा राज्य सरकारने काढला आहे. शाळेत विद्यार्थी येवोत अथवा न येतो शिक्षकांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत संबंधित शाळांमध्ये हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या असताना देखील शिक्षकांना आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १४ पंचायत समितीमधील सर्व शाळांमध्ये पोषण आहाराचे वितरण करण्याचे नियोजन आहे.
शाळांमध्ये धान्य नसल्याची ओरड
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना दुष्काळामुळे एप्रिल ते जून महिन्यात सुटीच्या कालावधीत शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र यासाठी शाळांना धान्य पुरवठाच करण्यात आला नसल्याची ओरड खुद शि़क्षकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)
सर्वच शाळांचा समावेश
जिल्ह्यातील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील सर्व विद्यार्थी याशिवाय काही खासगी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांना शासनाकडून दोन महिन्यांचा पोषण आहार यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र याचा लाभ बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी घेताना दिसत आहे.
शालेय विद्यार्थ्याना पोषण आहारासाठी धान्यसाठ्याचा काही ठिकाणी तुटवडा असला तरी अशा शाळांना धान्य पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे लवकरच हा पुरवठा होईल.
- एस.एम. पानझाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)