सारांश पान १ साठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:31+5:302021-07-22T04:09:31+5:30
अमरावती : स्थानिक पंचवटी चौकात भरधाव चारचाकीच्या धडकेत कारमधील पोलीस महिला जखमी झाली व त्यांच्या कारचे सुमारे २५ हजार ...

सारांश पान १ साठी
अमरावती : स्थानिक पंचवटी चौकात भरधाव चारचाकीच्या धडकेत कारमधील पोलीस महिला जखमी झाली व त्यांच्या कारचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. १९ जुलै रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. चंद्रशेखर पातोंड हे पत्नीला घेऊन एमएच २० वाय ०००६ या कारने ग्रामीण कंट्रोल रूमकडे जात असताना पंचवटी चौकात नागपूरहून इर्विनकडे येणाऱ्या एमएच २७ एआर ८८५६ क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनास धडक दिली. यात पातोंड यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------
कचऱ्याच्या वादातून महिलेचा विनयभंग
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरकाडीपुरा येथे कचऱ्याच्या वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच तिच्या वडिलांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. १९ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी मनोज उगोकार, श्रीकृष्ण उगोकार व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------------
संकुलाच्या पार्किंगसमोरून दुचाकी लंपास
अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका संकुलाच्या गल्लीमधील पार्किंगमधून एमएच २७ बीजी ४११३ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १९ जुलै रोजी दुपारी ही घटना उघड झाली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी इजाज खान आरीफ खान (२४, रा. मांडवा, धारणी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------------
इर्विनमध्ये गुरुवारी रोगनिदान शिबिर
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात २२ जुलै सकाळी ९ पासून रोगनिदान शिबिर आयोजिण्यात आले असून, नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले. सर्व आजारांच्या नॉनकोविड रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी या एकदिवसीय शिबिराचे आयोजन दिवसभर करण्यात आले आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन, प्रयोगशाळा चाचण्या, रोगनिदान व औषधोपचार आदी बाबींचा लाभ मिळेल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमणे यांनी दिली.
---------------------