सारांश न्युज इनबॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST2020-12-29T04:11:28+5:302020-12-29T04:11:28+5:30

वरूड : येथील नटराज कॉलनी येथील भाग्यश्री तरार यांची नऊ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स काठीवाले सभागृह परिसरातून लांबविण्यात ...

Summary News Inbox | सारांश न्युज इनबॉक्स

सारांश न्युज इनबॉक्स

वरूड : येथील नटराज कॉलनी येथील भाग्यश्री तरार यांची नऊ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स काठीवाले सभागृह परिसरातून लांबविण्यात आली. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. वरूड पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

शस्त्राचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न

परतवाडा : शस्त्राचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३९३ अन्वये गुन्हा नोंदविला. येथील सिव्हिल लाईन परिसरातील सुंदराबाई हायस्कूलच्या मागे राहणाऱ्या प्रकाश चंदनानी यांच्या घरी २५ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास हा प्रकार घडला होता.

---------------------

दिदंबा येथे तरुणाला चावा

धारणी : मद्यपीने काकाशी वाद घालून त्यास चावा घेतला तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी जखमी हिरामन बिसराम धिकार (३०, रा. दिदंबा) याच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी रवि गोरख कस्तुरे (रा. दिदंबा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मलातपूर येथे तरुणास मारहाण

अंजनसिंगी : आईसोबत वाद का घातला, अशी विचारणा करणाऱ्या तरुणास लाकडी पाटीने मारहाण करण्यात आली. २६ डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी जखमी अक्षय मसराम (२५, मलातपूर) याच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी भगवान मसराम (५०, मलातपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

शिवरा मार्गावर अपघात, दुचाकीस्वार ठार

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवरा ते सालोड मार्गावर दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात बबलू चव्हाण (२८, रा. सालोड) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ६ डिसेंबर रोजी हा अपघात घडला होता. ७ डिसेंबर रोजी त्याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी २६ डिसेंबर रोजी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस अटक

भातकुली : तालुक्यातील एका तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला. २६ डिसेंबर रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी सूरज छगन आठवले (३०, रा. कसबा खोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

----------------

फोटो पी २८ येवदा

काशीबाई अग्रवाल विद्यालयात भाऊसाहेबांची जयंती

येवदा : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व कै. भा.य. उपाख्य भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिमा पुजन व हारार्पण संचालक मनोज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रदीप लांडे, निळकंठ बोरोळे, नदीम अहमद, मोहित सुबुर इनामदार उपस्थित होते.

----------------

मेळघाटात बोरिंग मशीनचा शिरकाव

धारणी : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल तालुक्यांत दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती आणि शेतीमध्ये बोरिंग करण्यात येते. महसूल विभागाच्या परवानगीशिवाय हजारो कूपनलिका खोदण्यात येतात. त्यासाठी मेळघाटात बोरिंग मशीन दाखल झाल्या आहेत.

-------------

नियमबाह्य गाळेवाटप, कारवाई थंडावली

चांदूर बाजार : स्थानिक नगरपालिकेच्या मालकीच्या अ. कलाम आझाद व्यापारी संकुलातील ४० पैकी अनामत रक्कम व भाडे न भरलेल्या १९ गाळेधारकांना तत्कालीन पालिका प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने गाळ्यांचे वाटप केले. या प्रकरणात पाच नगरसेवकांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत या प्रक्रियेत पालिकेचे ४७ लाखांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. मात्र, अद्यापही या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाही.

---------------

करजगावात पुन्हा गुटखा विक्री

करजगाव : ऑक्टोबर महिन्यात येथील तीन व्यक्तींच्या घरातून तब्बल ८ लाख ६२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा करजगाव व परिसरात गुटखा बिनदिक्कतपणे विकला जात आहे.

------------------

वरूड तालुका ड्रायझोनमुक्त केव्हा?

वरूड : बंपर संत्रा उत्पादनासाठी ओळखला जाणारा वरूड तालुका सिंचनाअभावी कोरडाठक पडण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात संत्र्यांचे सर्वाधिक क्षेत्र असताना, केवळ सिंचन प्रकल्पांच्या रखडगाडीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या संत्राबागा जगविणे आव्हानात्मक ठरले आहे. प्रत्यक्षात अनेक वर्षानंतरही तालुक्याच्या माथी लागलेला ‘ड्राय झोन’चा डाग पुसता आलेला नाही.

---------------

Web Title: Summary News Inbox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.