सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:11+5:302021-07-08T04:10:11+5:30
अमरावती : दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. अंजनगाव ते दर्यापूर मार्गावरील कुंभारगाव फाट्यादरम्यान ५ जुलै रोजी ...

सारांश बातम्या
अमरावती : दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. अंजनगाव ते दर्यापूर मार्गावरील कुंभारगाव फाट्यादरम्यान ५ जुलै रोजी दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी मृताचा भाचा मंगेश झांबरे (३४, कोकर्डा) यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी एमएच २७ वाय ६३५४ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
वाहनाच्या धडकेत महिला जखमी
चांदूर बाजार : अज्ञात वाहनाच्या धडकेत दिलालपूर येथील ४५ वर्षीय शेतमजूर महिला जखमी झाली. ५ जुुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी राजू धुर्वे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
इमामपूर येथे इसमाला मारहाण
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील इमामपूर येथील दिनेश गवई (३९) यांना सळाखीने मारहाण करण्यात आली. ५ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी पंकज संतोष अभ्यंकर (रा. इमामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, घटस्फोटाची मागणी
अमरावती : वरूड तालुक्यातील राजुरा बाजार येथील २६ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. तिच्या नवजात मुलाला स्वीकारण्यास नकार देऊन घटस्फोटाची धमकी देण्यात आली. १० जानेवारी ते ५ जुलै दरम्यान ही घटना घडली. वरूड पोलिसांनी आरोपी कृणाल वानखडे, नामदेव वानखडे, आतिश वानखडे, सनी वानखडे व एक महिला (सर्व रा. राजुरा बाजार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
पुसला येथून दुचाकी लंपास
शेंदूरजनाघाट : पुसला येथील एका बँकेसमोरून एमएच २७ सीटी ०४८९ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ३ जुलै रोजी ही घटना घडली. शैलेश गोरडे (२४, रा. महेश कॉलनी, वरूड) यांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी ५ जुलै रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
अंबाड्याच्या बाजारपुरा येथे मारहाण
मोर्शी : तालुक्यातील अंबाडा येथे आकाश मुंद्रे याच्या डोळ्याला चावा घेण्यात आला, तर संजय परतेती याला मारहाण करण्यात आली. ४ जुलै रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ मुंद्रे (३०, रा. अंबाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
माहुली जहागिर येथे मारहाण
माहुली: माहुल जहागिर येथे मो. राजिक मो. इसहाक (४२) यांना मारहाण करण्यात आली. ४ जुलै रोजी ही घटना घडली. माहुली पोलिसांनी आरोपी शेख जम्मू शेख निसार व एक महिला (दोन्ही रा. माहुली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
शारदा जगताप यांचे निधन
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील मारडा येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कमलाकर देवराव जगताप यांच्या पत्नी शारदा जगताप (५१) यांचे २६ जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती मुलगा, मुलगी, जावई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
-----------
‘तहसील आपल्या दारी’ उपक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन
अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी विनाखंड व्हावी, यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान होत असून, शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
----------------------
सौर उष्णजल संयंत्र आस्थापित करण्यासाठी अनुदान योजना
अमरावती : सौरऊर्जेचा वापर वाढवा, यासाठी राज्यात सौर उष्णजल संयंत्र आस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाद्वारे (महाऊर्जा) आर्थिक साहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासकीय संस्था असलेल्या आस्थापनांना ५० टक्के अनुदान तत्त्वावर सौर उष्णजल संयंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा, विश्रामगृहे, दवाखाने, कारागृहे, प्रशिक्षण संस्था आदींकडून सौर उष्णजल संयंत्र मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
--------------
फोटो पी ०७ पवार
नगर वाचनालय ते बापट चौक ‘फेरीवाला क्षेत्र’ घोषित करावे
अमरावती : बसपा गटनेता चेतन पवार व नगरसेविका इशरत बानो मन्नान खान यांनी नगर वाचनालय श्याम चौक ते बापट चौक मार्ग ‘अमरावती फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्याबाबत महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना निवेदन दिले. मंगळवारी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. तेथे २८ दुकानदार व्यवसाय करीत आहेत.
-----------
‘एक वृक्ष एक विद्यार्थी’ संकल्पना राबवावी
अमरावती : पर्यावरण जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एनएसएस विभागाने उपक्रमात वृक्षारोपणाकरिता सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण जनजागृती अभियानामध्ये विद्यापीठाने सहभाग घ्यावा व विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन स्तरावर ‘एक वृक्ष एक विद्यार्थी’ संकल्पना राबवावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरूंना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनातून केली आहे.
----------------
पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
अमरावती : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशसाठी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना आता दहावीच्या गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. प्रथम वर्षासाठी प्रवेश ३० जूनपासून संस्थेत सुरुवात करण्यात आली आहे.
--------
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
अमरावती : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग तसेच डोमेस्टिक वर्कर यासंबंधी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन रोजगार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
----------
उल्हास सोळके स्मृत्यर्थ एक लाख देणगी
अमरावती : जनकल्याण सेवा संस्था संचालित रुग्णसेवा सदनचे माजी व्यवस्थापक उल्हास सोळके यांचे निधन झाले. त्यांच्या या जिव्हाळ्याची जाणीव ठेवत सोळके यांचा पुत्र अंकुश सोळके याने एक लाख रुपयांची भरीव देणगी त्यांच्या स्मृत्यर्थ संस्थेला भाराणी मेमोरिअल क्रिटिकल केअर युनिटसाठी प्रदान केली.
-----------