सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:17+5:302021-06-06T04:10:17+5:30

शिरजगाव कसबा : चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी ते सर्फापूर रोडवरील एका गोठ्यासमोर बांधलेला ५० हजार रुपये किमतीचा बैल चोरून नेत ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

शिरजगाव कसबा : चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी ते सर्फापूर रोडवरील एका गोठ्यासमोर बांधलेला ५० हजार रुपये किमतीचा बैल चोरून नेत असताना एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ३ जून रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी शेतकरी प्रमोद सोनारे यांच्या तक्रारीवरून आरोपी मो. फैजान अ. कलाम (२८, रा. माहुली जहागीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

देवमाळीत इसमाला शिवीगाळ

परतवाडा : देवमाळी येथील मनोहर मानकर (५४) यांना शिवीगाळ करण्यात आली तथा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. २ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी भीमराव मेश्राम (४५, व्यंकटेश नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

घाटलाडकी येथे तरुणाला मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : घाटलाडकी येथे विलास खाजोने (३१) याला काठीने मारहाण करण्यात आली. ३ जून रोजी दुपारी ही घटना घडली. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कैलास माकोडे (२४, अंजनगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

फरीद कॉलनीत दुचाकी जाळण्याचा प्रयत्न

मोर्शी : येथील फरीद कॉलनी परिसरातील अ. नसीम अ. वाजिद यांची एमएच २७ बीआर २४४६ क्रमांकाची दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात डिक्कीचा किंचित भाग जळाला. २ जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी अ. वसीम अ. वाजिद (३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

कुंभारगाव येथे तरुणाला मारहाण

कुंभारगाव : तालुक्यातील कुंभारगाव येथे दिनेश खंडारे (२९) याला मारहाण करण्यात आली. २ जून रोजी रात्री ही घटना घडली. रहिमापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुरेश रायबोले व बाबाराव रायबोले (रा. कुंभारगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

कृषिपंपाची केबल लंपास

अंजनगाव सुर्जी : सुर्जी शिवारातील २३० फूट केबल लंपास करण्यात आली. १ ते २ जून दरम्यान ही घटना घडली. रूपेश आंबेकर (३२, रा. सावकारपुरा) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

वणी फाट्यावरून ट्रक लांबविला

तिवसा : तालुक्यातील वणी फाट्यावरून एमएच २७ बीएक्स ४९४३ क्रमांकाचा ट्रक लंपास करण्यात आला. त्यात आठ ब्रास रेतीदेखील होती. २ जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी त्या ट्रकच्या चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

दर्यापूरचे गजानन भारसाकळे यांना पर्यावरण पुरस्कार जाहीर

अमरावती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दर्यापूर येथील गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन भारसाकळे यांना डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने यावर्षीचा पर्यावरण कार्यगौरव पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण पुढील आठवड्यात होणार आहे.

---------

फोटो पी ०५ भाजीबाजार

भाजीबाजार झोनमध्ये २५७ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट

अमरावती : ४ जून रोजी रोजी सकाळी ८.३० पासून बोहरा गल्ली, सराफा, भातकुली नाका या ठिकाणी २५७ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. चार नागरिकांना मास्कबाबत प्रत्येकी ७५० रुपयांप्रमाणे एकूण ३००० रुपये दंड आकारून मास्क वाटप करण्यात आले. सदर मोहिमेत सहायक उपनिरीक्षक विकी जेधे, पोलीस कॉन्स्टेबल सागर कडू, स्वास्थ्य निरीक्षक, अभियंता, कर लिपिक, पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

--------------

चपराशीपुरा भागात १०२ जणांची टेस्ट

अमरावती : चपराशीपुरा चौकात ४ जून रोजी १०२ आरटी-पीसीआर चाचणी करून घेण्यात आली. मास्क नसल्याने एकाकडून ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी सहायक क्षेत्रीय अधिकारी देवरणकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक चोरपगार, पंकज तट्टे, शैलेश डोंगरे, सुमेध मेश्राम, वसुली लिपिक उपस्थित होते.

--------

धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावती : धनगर अधिकारी-कर्मचारी संघटनेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपासून तर पुण्यतिथीपर्यंत आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता ‘एक पत्र समाजासाठी’च्या अनुषंगाने एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातसुद्धा या अभियानाची सुरुवात झाली आहे.

-------------

देऊरवाडा येथील मरामाय मंदिराचा जीर्णोद्धार

कुऱ्हा : देऊरवाडा येथील लाडेगाव-टाकरखेडा या रस्त्यावरील पुरातन काळापासून मरामाय मंदिर होते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार देऊरवाडा येथील सतरे कुटुंबीयांनी केला. २ जून रोजी देवी प्रतिष्ठान मुहूर्तावर विधिवत पूजनाने मरामाय मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

--------------

दस्तुरनगर चौकात मोहिम, १८ हजार दंड

अमरावती : स्थानिक दस्तुरनगर चौकात ३ जून रोजी मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे याबाबत दंडात्मक मोहीम सहायक संचालक प्रफुल शेळके, स्वास्थ्य निरीक्षक रोहित हडाले, पोलीस कॉन्स्टेबल नागोसे यांच्यासह राबविण्यात आली. २४ नागरिकांनी मास्कचा वापर न केल्याने त्यांच्याकडून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.