नामनिर्देशन अर्जासोबत मालमत्ता कर भरण्याची सूट
By Admin | Updated: July 9, 2015 00:12 IST2015-07-09T00:12:05+5:302015-07-09T00:12:05+5:30
२७ जुलै रोजी जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.

नामनिर्देशन अर्जासोबत मालमत्ता कर भरण्याची सूट
ग्रामपंचायत निवडणूक : उच्च न्यायालयाने दिली आहे स्थगिती
अमरावती : २७ जुलै रोजी जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी ४ जुलैपासून आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नामांकन अर्जासोबत मालमत्ताकराचा भरणा केल्याचा दाखला जोडण्याची सूट देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याविषयीचे पत्रक प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १७७९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी २७ जुलै रोजी मतदान होईल. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४१ (१), (६), व (६-१) यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तिंच्या नावे मालमत्ता कर किंवा इतर शुल्कांच्या रकमेची थकबाकी राहू नये, यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर थकीत कराचा भरणा करुन घेतला जात होता. ग्रामपंचायत अधिनियम १९५७ च्या कलम १२४ व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी अधिनियम १९६० अन्वये मालमत्ता कराची आकारणी केली जाते. त्यानुसार राज्य शासनाने ३ डिसेंबर १९९९ च्या शासन अधिसूचनेनुसार मालमत्तेच्या क्षेत्रफळावर आधारीत कर आकारणीबाबत सुधारणा केली आहे.