पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर, सरकारची काटकसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:21+5:302021-06-03T04:10:21+5:30
अमरावती : बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे व त्यांना पोषक आहार मिळावा, यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या पूरक आहारात ...

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर, सरकारची काटकसर
अमरावती : बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे व त्यांना पोषक आहार मिळावा, यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या पूरक आहारात बदल करण्यात आला आहे. गतवर्षी आहारात तेलाचा समावेश होता. मात्र, आता खाद्य तेलाऐवजी साखरेचे वाटप करण्यात येत आहे. शरीराला आवश्यक उष्मांकाच्या गरजेनुसार आहारात हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत असले तरी काटकसरीचा हा प्रकार असल्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना नियंत्रणात अंगणवाडी सेविका कार्यरत असताना, त्यांच्याकडून बालक, स्तनदा माता व गरोदर मातांना या आहार साहित्याचे पाकीट वितरित केली जात आहेत. अंगणवाडी केंद्रांना कच्चे धान्य व किराणा मालाची पॅकिंग केलेले किट देण्यात येते. यात चवळी, मूग, डाळ, गहू ,मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर आदी साहित्य दिले जाते. यात गेल्यावर्षी खाद्यतेलाचा समावेश होता. आता त्याला फाटा देत साखरेचा समावेश करण्यात आला आहे.
बॉक्स
पूरक आहारात काय मिळते?
1)शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षे वयोगट, गरोदर माता व स्तनदा माता, सहा महिने ते सहा वर्ष वयोगट व तीन ते सहा वयोगटातील लाभार्थींना पूरक पोषण आहाराचा लाभ दिला जातो.
२) या आहारात चवळी, चणा, मूग डाळ, मसूर डाळ, गहू ,मिरची पावडर, हळद पावडर, मीठ आणि साखर यांचा समावेश आहे.
३) पाककृतीमधील धान्याचा प्रकार, प्रतिदिन लाभार्थींना द्यावयाचे प्रमाण, त्यातील उष्मांक आणि प्रथिने यांचा विचार करून हा आहार देण्यात येतो.
बॉक्स
पूरक पोषण आहार योजना
एकूण लाभार्थी
शून्य ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी - १५०४५२
गरोदर महिला लाभार्थी -१२४३३
स्तनदा माता -११९१९
कोट
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना कालावधीत शिजवलेला आहार देता येत नसल्याने बालक व मातांना या आहाराचे पॅकिंग दिले जात आहे. उष्मांक व प्रथिनांचा विचार करूनच आहारात वरिष्ठ पातळीवर बदल करण्यात आला आहे.
प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण
बॉक्स
कोरोना कालावधीतही काम
शहरासह ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविका, मदतनीस अप्रत्यक्ष सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह त्यादेखील कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत. जिल्हा प्रशासनाला नियमित कामकाजासमवेत कोरोनासंबंधी कामाची उद्दिष्टपूर्ती त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
कोट
शासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. तेलाला साखर हा पर्याय कसा असू शकतो? ते नसेल, तर पोषण आहार तयार कसा करावा? लाभार्थींच्या हितासाठी शासनाने हा निर्णय मागे घ्यावा.
रोशनी कावरे
कोट
सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच शासनाने लाभार्थींना दिलासा देण्याऐवजी संकटकाळात वाऱ्यावर सोडून दिले आहे. आहार तयार करताना फोडणी कशी द्यायची, हे शासनाने सांगावे.
सविता सहारे
कोट
शासनाने ज्या उद्देशाने पोषण आहार गरजू लाभार्थींना देण्यासाठी ही योजना सुरू केली होती, त्या उद्देशाला यामुळे तडा गेला आहे. लाभार्थींचा विचार न करताच हा निर्णय घेतला गेला आहे.
कल्याणी माेरे