अवकाळी पावसाने यार्डातील तुरीचे नुकसान
By Admin | Updated: May 14, 2017 00:05 IST2017-05-14T00:05:24+5:302017-05-14T00:05:24+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानकपणे पाऊस पडला. यामुळे बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेले तुरीचे पोते ओले झाले.

अवकाळी पावसाने यार्डातील तुरीचे नुकसान
बाजार समित्यांची अनास्था : तूर दाण्यातील आर्द्रता वाढल्यास खरेदीस धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानकपणे पाऊस पडला. यामुळे बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेले तुरीचे पोते ओले झाले. बाजार समितीद्वारा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात ताडपत्री उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यात या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र याकडे बाजार समित्यांनी दुर्लक्ष केले. अनेक बाजार समित्यांमध्ये तूर झाकण्यासाठी पुरेशा प्रमाणात ताडपत्री नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेली तुरीची पोते जमेल त्या साहित्याने झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या सुमारास अचानक आलेला पाऊस व वीज पुरवठ्यात खंड यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. बाजार समितीमधील पावसाचे पाणी वाढल्याने पोते वरून झाकली असली तरी खालच्या बाजूने मात्र ओली झाली. शेतकऱ्यांनी सकाळी ही तूर सुकविण्याचा प्रयत्न केला. तूर अधिक भिजल्यास किंवा तुरीच्या दाण्यामधील आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांवर असल्यास राज्य सरकारद्वारा खरेदी करण्यात येणार नाही, अशी अट केंद्रावर आहे.
शनिवारी सकाळपासून कडक उन्ह असल्यामुळे शेतकऱ्यांनी तूर वाळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर तुरीची खरेदी सुरू असल्याची माहिती व्हीसीएमएफचे व्यवस्थापक राजेश विधळे यांनी सांगितले.