शेतमाल तारणावर साडेसहा कोटींची मदत

By Admin | Updated: March 30, 2017 00:08 IST2017-03-30T00:08:19+5:302017-03-30T00:08:19+5:30

शेतमाल काढणीपश्चात बाजारात मालाची आवक वाढते व भाव कोसळतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.

Subsidy help worth Rs | शेतमाल तारणावर साडेसहा कोटींची मदत

शेतमाल तारणावर साडेसहा कोटींची मदत

शेतकऱ्यांना लाभ : १३ संस्थांमध्ये ८९६ शेतकऱ्यांचे ३३ हजार क्विंटल तारण
अमरावती : शेतमाल काढणीपश्चात बाजारात मालाची आवक वाढते व भाव कोसळतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी व शेतकऱ्यांची निकड भागविण्यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात १ मार्चपर्यंत ८९३ शेतकऱ्यांनी १३ सहकारी संस्थांमध्ये ३३ हजार ६१९ क्विंटल शेतमाल तारण ठेवला असून यावर त्यांना ६ कोटी ४० लाख ५८ हजार ९५३ रूपयांचे कर्जमिळाले आहे.
हंगामात बाजारभाव कोसळले असताना शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारी ही योजना आहे. कृषी पणन् मंडळ, स्वनिधीतून, बाजार समितींच्या माध्यमातून शेतमालाच्या तारणावर कर्जपुरवठा करते. पणन् मंडळाकडून घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या बाजार समितींना पणन् मंडळाकडून तीन टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाते. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील १० बाजार समिती व नेरपिंगळाई सेवा सोसायटीने ८९६ शेतकऱ्यांना ३३ हजार ६१९ क्विंटलवर ६ कोटी ४० लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये अंजनगाव बाजार समितीमध्ये सात शेतकऱ्यांना १८४ क्विंटलवर ५ लाख ६ हजार ८८ रूपयांचे वाटप करण्यात आले. चांदूररेल्वे येथे पाच शेतकऱ्यांना १५२ क्विंटल तूर, सोयाबीनवर तीन लाख ८७ हजारांचे कर्ज देण्यात आले. दर्यापूरमध्ये १६ शेतकऱ्यांना ४०१ क्विंटल शेतमालावर नऊ लाख ९५ हजारांचे तारणकर्ज देण्यात आले. मोर्शी मध्ये १७ शेतकऱ्यांना ५०० क्विंटलवर १४ लाखांचे, वरूडमध्ये चार शेतकऱ्यांना १६३ क्विंटलवर चार लाख दोन हजार रूपये, नांदगावमध्ये दोन शेतकऱ्यांना १५७ क्विंटल शेतमालावर दोन लाख ७० हजारांचे वाटप करण्यात आले.

प्रस्ताव सादर केल्यास मुदतवाढ
तारणकर्जाची मुदत १८० दिवसांची असली तरी काही अपरिहार्य परिस्थितीत विक्रीचे वेळी मंदी असल्यास व पुढील काळात बाजारभाव वाढविण्याची शक्यता असल्यास संबंधित बाजार समितीने कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव सादर केल्यास मुदतवाढ मिळू शकते.

तारणकर्जाची
सहा महिने मुदत
शेतमाल तारण कर्जाची मुदत १८० दिवस (सहा महिने) असते. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या तारण कर्ज रकमेवर ६ टक्के प्रमाणे आकारणी करुन कृषी पणन मंडळास ३ टक्क्याप्रमाणे कर्ज व व्याज परतफेड करण्यात यते. उर्वरित ३ टक्के हे बाजार समितीस प्रोत्साहन अनुदान मिळते.

बाजार समित्यांची
ही जबाबदारी
शेतकऱ्यांचा शेतमाल तारण ठेवण्यासाठी बाजार समितींद्वारा त्यांच्या गोदामाचा विनामूल्य वापर करण्यात येतो. गोदाम भाडे, गोदामापर्यंत वाहतुकीचा खर्च, देखरेख खर्च, शेतमालाचा विमा इत्यादी खर्च बाजार समितींद्वारा केला जातो. गोदामामध्ये शेतमाल साठविणे व संरक्षणाची जबाबदारी बाजार समितींची आहे.

धामणगाव, नेरपिंगळाईला सर्वाधिक शेतकऱ्यांचे तारण
मोर्शी तालुक्यामधील नेरपिंगळाई सेवा सहकारी सोसायटीद्वारा ३५४ शेतकऱ्यांना १६ हजार क्विंटल सोयाबीनवर दोन कोटी २५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले.
धामणगाव बाजार समितीमध्ये ३३४ शेतकऱ्यांना आठ हजार ८०५ क्विंटल शेतमाल तारणावर दोन कोटी एक लाख ९१ हजारांचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
अमरावती येथे १३४ शेतकऱ्यांना पाच हजार ३१० क्विंटल तूर, सोयाबीनवर एक कोटी ५२ लाख ०४ हजार ८० रुपयांचे तारण कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले.
अचलपूर व तिवसा बाजार समितीची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने शेतमाल तारणावर कर्जवाटप नाही तर धारणी येथे बाजार समिती वापरात नाही.

Web Title: Subsidy help worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.