व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: October 28, 2016 00:17 IST2016-10-28T00:17:09+5:302016-10-28T00:17:09+5:30
शासनाने जाहीर केलेल्या शासकीय हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे,

व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
संभाजी ब्रिगेडची मागणी : हमीपेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी
अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या शासकीय हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अलीकडेच हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास थेट फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमात दिले होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात हजारो क्विंटल सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केले आहे. याचे पुरावे दाखवत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीकेली आहे.
सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. याचा संपूर्ण उत्पादन खर्च एकरी दहा ते बारा हजारांच्या घरात आहे. शासनाने २७७५ रुपये एवढा हमी भाव सोयाबीनला जाहीर केला असला तरी व्यापारी मात्र हजार ते २५०० रुपये दरानेच सोयाबीन खरेदी करून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. परिणामी या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढण्याची भीती संभाजी ब्रिगेडच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर विनाविलंब कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय सोयाबीन व उडीद या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शासनाने शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी त्वरित स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळासोबत चर्चेदरम्यान शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची योग्य चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले.
निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय सदस्य अभय गावंडे, प्रवक्ता प्रेमकुमार बोके, जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, शहर उपाध्यक्ष समीर नांदूरकर, शुभम शेरेकर, आनंद ढोले, अक्षय निर्मळ, निखिल काहोलकर, प्रितम बागडे, आदित्य देशमुख, विनोद हागोने, लोकनाथ काळमेघ, अजिंक्य काळे, अभिजित पडोळे, अभिजित देशमुख, मिलिंद सवाई, स्वामी गुप्ता, शुभम भोकरे, गौरव इंगळे, अरविंद घाटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)