उपजिल्हा रुग्णालय, रक्तपेढीकरिता धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:00+5:302021-06-02T04:12:00+5:30
वरूड : शहरात उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या मागणीकरिता रक्तपेढी निर्मिती आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयापुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

उपजिल्हा रुग्णालय, रक्तपेढीकरिता धरणे
वरूड : शहरात उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या मागणीकरिता रक्तपेढी निर्मिती आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयापुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
रक्तपेढीकरिता २ कोटी ३३ लाख रुपये निधी मिळाला आहे. परंतु, जागेअभावी काम पुढे सरकले नाही. मध्यंतरी वरूड येथील दानदाते डॉ. सुधाकर बंदे यांनी तीन एकर जागा उपजिल्हा रुग्णालयाकरिता दान दिल्याने हा प्रश्न मिटला. तरीसुद्धा प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रक्तपेढी आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न रखडला आहे.
रक्तपेढी कार्यान्वित झाली, तर अनेकांना याचा लाभ मिळू शकतो. रक्तदाता संघ, वरूडने सहा वर्षांत हजारो रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला. मात्र, रक्तपेढी अस्तित्वात असती, तर आणखी रुग्णांना लाभ झाला असता. याकरिता शासन-प्रशासनाचे उंबरठे झिजविले गेले, पण कोणीही लक्ष दिले नाही. अखेर शहरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन रक्तपेढी निर्मिती आंदोलन समितीच्यावतीने तहसील कार्यालयापुढे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांनी सदर विषयाची माहिती घेऊन आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी समितीचे धनंजय बोकडे, किशोर तडस , जितेंद्र शेटीये, अशोक नानोटकर, माया यावलकर, नितीन खेरडे, नितीन अंगदकर, मुरलीधर पवार, सोनाली लांडगे, सोनल चौधरी, जया नेरकर, राहुल गावंडे, लोकेश अग्रवाल, कार्तिक चौधरी, मंगला कुकडे, ऋषीकेश मुऱ्हेकर, कैलास उपाध्याय आदी उपस्थित होते.