स्टंट रायडिंग, तरुणाई बिथरली
By Admin | Updated: March 19, 2016 00:09 IST2016-03-19T00:09:25+5:302016-03-19T00:09:25+5:30
जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात एका वाहन विक्रेता कंपनीने दुचाकीच्या जाहिरातीसाठी ‘स्टंट रायडिंग’ची प्रात्यक्षिके आयोजित केलीत.

स्टंट रायडिंग, तरुणाई बिथरली
जिल्हा क्रीडा संकुलातील प्रकार : कंपनीचे जाहिरातीसाठी प्रात्यक्षिक, सामान्यांंचे चुकले ठोके
अमरावती : जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात एका वाहन विक्रेता कंपनीने दुचाकीच्या जाहिरातीसाठी ‘स्टंट रायडिंग’ची प्रात्यक्षिके आयोजित केलीत. ‘रॅश रायडिंग’च्या विरोधात जनजागृतीचा देखावा करून सुसाट दुचाकींची भयभीत करणारी प्रात्यक्षिके सुरू झाली आणि बिथरलेल्या प्रेक्षक तरूणाईने दाखविलेल्या गोंधळामुळे सामान्यांच्या हृदयाचे मात्र ठोके चुकले.
वास्तविक जिल्हा स्टेडियमच्या आवारात आयोजित या उपक्रमात वाहतूक नियम पूर्णपणे पायदळी तुडविण्यात आले होते. ‘स्टंट रायडिंंग’चा थरार अनुभवणारे बघे तरूण जोशात येऊन आरडाओरडा करीत होते. तब्बल दोन तास हा प्रकार सुरूच होता. हा थरार आटोपल्यानंतर स्टेडियमबाहेर पडणाऱ्या युवकांच्या अंगात जणू वारे संचारले होते. ‘स्टंट रायडिंग’च्या वातावरणाशी समरस झालेल्या या तरूणांनी रस्त्यावर भन्नाट वेगाने दुचाकी पिटाळल्या. कर्णकर्कश्श हॉर्नच्या आवाजांनी परिसरातील दुकानदार, विद्यार्थी आणि सामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी जिल्हा क्रीडा संकुल परिसरात हा प्रकार दुपारच्या सुमारास घडला.
यावेळी एका दुचाकी कंपनीने दुचाकीच्या मार्केटिंगच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला होता. कंपनीचेच दोन युवक दुचाकीवर स्वार होऊन हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या कसरती करीत होते. हे स्टंट पाहून तरूणांच्या अंगात वारे शिरले प्रात्यक्षिक पाहून बाहेर पडताना या तरूणांनी प्रचंड गोंधळ केला. दुचाकी वेगाने पिटाळल्या, जोरजोरात हॉर्न वाजवले. यावेळी एखादा अपघातही घडू शकला असता. ‘रॅश ड्रायव्हिंग’बाबत जागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमानंतर तरूणांनीच प्रचंड ‘रॅश ड्रायव्हिंग’ केले.
आयोजकांवर कारवाई होणार काय ?
‘रॅश ड्रायव्हिंग’बाबत जनजागृती करण्याकरिता जिल्हा क्रीडा संकुलात हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र, यावेळी ‘स्टंट रायडिंग’ची थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आलीत. ही एकप्रकारे प्रशासनाची फसवणूकच आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे आता आयोजकांवर पोलीस कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन
‘स्टंट रायडिंग’ अनुभवल्यानंतर तरूणांनी आपआपल्या बाईक घेऊन भर रस्त्यावर चक्क ‘रॅश ड्रायव्हिंग’ केले. ध्वनी प्रदूषण अधिनियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. सायरन व अतिक्षमतेच्या हॉर्नचा वापरदेखील करण्यात आला.
बाईक कंपनीने जाहिरात करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात हा उपक्रम राबविला आहे. तेथे काही वेगळा प्रकार घडला असेल तर पोलिसांना लक्ष ठेवण्यास सांगू. स्टंट दाखवून जाहिरात करणे, असे उपक्रम अनेकदा राबविले जातात.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.
बाईक चालविताना घ्यावयाची काळजी, यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला. त्यांना तीन तासांकरिता परवानगी देण्यात आली होती.
- जयप्रकाश दुबळे,
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा