तिवसा पोलीस ठाण्यात अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:51+5:302021-02-05T05:23:51+5:30
पालकमंत्री : ज्ञानसंस्कृती संवर्धनासाठी वाचनालय उपयुक्त तिवसा : ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांना अध्ययन साधने व अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण ...

तिवसा पोलीस ठाण्यात अभ्यासिका
पालकमंत्री : ज्ञानसंस्कृती संवर्धनासाठी वाचनालय उपयुक्त
तिवसा : ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांना अध्ययन साधने व अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळवून देणे, यासाठी वाचनालय व अभ्यासिकेची आवश्यकता असते. तिवसा येथे अभ्यासिका सुरू होत आहे. त्याचा विनियोग करत, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी तिवसा येथे केले.
तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, पंचायत समिती सभापती पूजा आमले, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, ठाणेदार रिता उईके, एपीआय विवेकानंद भारती, राजेश पांडे, शैलेश म्हस्के आदी उपस्थित होते. पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे, असे हरिबालाजी यांनी सांगितले. उईके यांनी प्रास्ताविक तर गौरव तिवस्कर यांनी संचालन केले.