आयुष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे
By Admin | Updated: June 30, 2015 00:19 IST2015-06-30T00:19:34+5:302015-06-30T00:19:34+5:30
'कुशल महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र' ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आत्मसात करावे,

आयुष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील : परतवाडा येथे रोजगार मेळावा
अमरावती : 'कुशल महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र' ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आत्मसात करावे, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी परतवाडा येथे केले.
परतवाडा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्याद्वारे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, आमदार रमेश बुंदिले, आमदार श्रीकांत देशपांडे, अचलपूरचे नगराध्यक्ष नंदलाल नंदवंशी, चांदूरबाजारच्या नगराध्यक्ष शुभांगी देशमुख, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, झडके, गावंडे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक अशोक पाईकराव, चिमणकर, गिरीश झंझाड, नागपूर विभागातील रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी आदी उपस्थित होते.
ना. रणजित पाटील पुढे म्हणाले की, देशात तरूणांची सर्वाधिक संख्या आहे. त्यांचे वयोमान हे २५ ते ३५ वयोगटातील आहे. आपल्या देशाला जागतिक पातळीवर महासत्ता बनविण्यासाठी तरूणांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम आत्मसात केल्यास देशाची प्रगती नक्कीच होईल. देशात व राज्यात विविध कौशल्य आधारित अशा अनेक कंपनी आणि शासकीय संस्थांमध्ये युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. याचा युवकांनी उपयोग करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
युवकांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्धीसाठी राज्य शासनाने कौशल्य विकास व उद्योजकता खाते निर्माण केले आहे. या खात्यामार्फत राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर सुमारे १५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. राज्यातील पाच लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन या विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगारभिमुख उपक्रमासाठी अंदाजित ९०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. राज्यात तालुका, जिल्हास्तरावर व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अशा रोजगार मेळाव्याचे २२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या रोजगार मेळाव्यात सुमारे ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी चार कंपन्या सहभागी झाल्या आहेत, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार बच्चू कडू आणि रमेश बुंदीले यांनीही विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक अशोक पाईकराव यांनी केले. (प्रतिनिधी)