विद्यार्थी म्हणतात, मला चॉकलेट नको, मास्क, सॅनिटायझर हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:34+5:302021-02-09T04:14:34+5:30

शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हट्ट, १२ दिवसांत मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ अमरावती : शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना ...

Students say, I don't want chocolate, I want masks, sanitizers! | विद्यार्थी म्हणतात, मला चॉकलेट नको, मास्क, सॅनिटायझर हवे!

विद्यार्थी म्हणतात, मला चॉकलेट नको, मास्क, सॅनिटायझर हवे!

शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हट्ट, १२ दिवसांत मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ

अमरावती : शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना चॉकलेट, नवीन शैक्षणिक साहित्य असे विविध प्रलोभने दाखवली जातात. मात्र, आता मुलांची मागणी बदलल्याचे दिसून येत आहे. आता शाळेत जाण्यासाठी मुले चॉकलेट नव्हे, तर मास्क, सॅनिटायझरची बाटल हवी, असा हट्ट धरू लागली आहेत.

शाळकरी मुलांच्या या हट्टामुळे गत १२ दिवसांत मास्क, सॅनिटायझरची विक्रीत वाढ झाली आहे. कोरोना संसर्गामुळे बंद झालेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोरोना नियमावलींचे पालन करीत इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेली मुले शाळेत जायला लागली आहेत. शाळा सुरू होऊन अवघे १२ दिवस लोटले असून, या १२ दिवसांत मेडिकल स्टोअरमधून मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. शाळा सुरू असताना मुले दररोज नवीन पेन, पेन्सिल, वही, कंपास यांसारख्या शैक्षणिक साहित्यासह चॉकलेट, बिस्कीटची मागणी पालकांकडे करतात. मुलांकडून होणाऱ्या हट्टातील वस्तू आता बदलल्याचे चित्र शाळांमध्ये अनुभवले जात आहे. मुले शाळेत जाण्यापूर्वी आता पालकांकडे नवीन मास्क, सॅनिटायझर बॉटलची मागणी करीत आहेत. मित्राने जसे रंगीबेरंगी मास्क आणले, मलाही तसे हवे, यासाठी मुले हट्ट धरत असल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या या हट्टामुळे मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाल्याचे सर्वश्रुत आहे.

----------------

‘स्प्रे’ सॅनिटायझरची मागणी

मुलांकडून सध्या शाळेत नेण्यासाठी स्प्रे करणाऱ्या सॅनिटायझरची मागणी होत आहे. सध्या मेडिकलमध्ये अगदी २५ रुपयांपासून सॅनिटायझरच्या बॉटल उपलब्ध आहेत. त्यामध्ये जेलीवाले सॅनिटायझर, स्प्रेवाले सॅनिटायझर आहेत. परंतु, स्प्रे करणारा सॅनिटायझरच हवा, असा मुलांचा हट्ट आहे.

-----------------------

रंगीत, डिझाईनच्या मास्कची क्रेझ

शाळेत आपलाच मास्क चांगला दिसावा, यासाठी विशेषत: मुलींमध्ये रंगीबेरंगी, विविध डिझाईनच्या मास्कची क्रेझ वाढली आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे व डिझाईनचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, मुली डिझाईनच्या मास्कला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

--------

दप्तरात घेतली सॅनिटायझरने जागा

पूर्वी शाळेत जाताना मुलांना चॉकलेट, वही, पेन अथवा पेन्सिल घेऊन द्यावी लागत होेती. आता वेगवेगळ्या मास्क आणि सॅनिटायझरचे हट्ट पुरवावे लागत आहे.

- प्रगती बांबाेडे, अमरावती.

---------------

दर दोन दिवसांनी लागते सॅनिटायझर

शाळा सुरु झाल्यापासून गत १२ दिवसांपासून मास्क, सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. दर दोन दिवसांनी मुले मास्क, सॅनिटायझर खरेदीसाठी येत आहेत.

- नितीन मांजरे, मेडिकल स्टोअर संचालक

-----------------

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा- १९९४

सुरू झालेल्या एकूण शाळा- १७७६

विद्यार्थ्यांची उपस्थिती - ७३५४५

Web Title: Students say, I don't want chocolate, I want masks, sanitizers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.