वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी
By Admin | Updated: March 7, 2017 00:20 IST2017-03-07T00:18:51+5:302017-03-07T00:20:48+5:30
स्थानिक गाडगेनगर परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.३ मध्ये पुरवठादाराने कमी दर असल्याचे कारण पुढे करून १ मार्चपासून विद्यार्थ्यांना जेवण देणे बंद केले.

वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी
गाडगेनगरातील प्रकार : परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना यातना
अमरावती : स्थानिक गाडगेनगर परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.३ मध्ये पुरवठादाराने कमी दर असल्याचे कारण पुढे करून १ मार्चपासून विद्यार्थ्यांना जेवण देणे बंद केले. परिणामी गत चार दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. अखेर सोमवारी विद्यार्थ्यांनी अपर आयुक्त कार्यालय गाठून ‘जेवण द्या’ अशी आर्त हाक दिली.
आदिवासी विकास विभाग अधिनस्थ गाडगेनगरात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. ३ मध्ये ९५ विद्यार्थी प्रवेशित आहेत. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवठादारांकडून जेवण दिले जाते. त्याकरिता निविदा प्रक्रियेअंती अटी व शर्थीनुसार भोजन पुरवठा करण्याचा कंत्राट सोपविण्यात आला. मात्र भोजन पुरवठादाराने कमी दराने जेवण देणे शक्य नसल्याचे पत्र आदिवासी विकास विभागाला यापूर्वीच देत १ मार्चपासून जेवण देणे बंद करणार, असे कळविले होते. परंतु त्या विद्यार्थ्यांना जेवण देण्याबाबत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यास संबंधितांना अपयश आले. चार दिवसांपासून जेवण नसल्याने व्यथित होऊन सोमवारी विद्यार्थ्यांनी एटीसी कार्यालायत धडक दिली. इयत्ता १२ वी पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण मिळू नये, ही बाब गंभीर मानली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अपर आयुक्त गिरीश सरोदे यांची भेट घेऊन आपबिती कळविली. परीक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांना जेवण उपलब्ध करून द्या, अशी मागणी सुरज सोळंके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मेस उपलब्ध करून द्या, अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे घेतली. एटीसी सरोदे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आदिवासी विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर वसतिगृहाचे गृहप्रमुख पोळ व गृहपाल आर. के. खंडाते यांना एटीसींनी बोलावून घेतले. वसतिगृहात जेवणाची निर्माण झालेली समस्या त्वरेने निकाल काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सूरज सोळंके, परमेश्वर बोबंळे, शैलेश उईके , गोपाल शिकारे, रामदास धिकार, योगेश पवार, देवानंद चव्हाण, अमोल सोळंके, हिराचंद कास्देकर, रमेश कास्देकर, नागोराव मोरे, नीलेश सोळंके, हेमंत उईके, विजय मरसकोल्हे, अमृत मावसकर आदींनी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एटीसी कार्यालयात धडक दिली.
भोजन पुरवठा प्रक्रियेत कंत्राट मिळावा, यासाठी कमी दराने निविदा टाकली जाते. भोजन पुरवठादार मध्यंतरी कंत्राट सोडून जातात. असाच प्रकार गाडगेनगर वसतिगृहात झाला आहे. मात्र भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून नवीन पुरवठादाराकडे व्यवस्था सोपविली आहे.
- नितीन तायडे, उपायुक्त, अमरावती