आश्रमशाळेचे विद्यार्थी धडकले प्रकल्प कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 00:09 IST2016-07-28T00:09:11+5:302016-07-28T00:09:11+5:30
इयत्ता ८ ते १० वी करीता शिक्षक नियुक्त करा, या प्रमुख मागणीसाठी नजीकच्या बिजुधावडी येथील पोस्ट बेसिक ...

आश्रमशाळेचे विद्यार्थी धडकले प्रकल्प कार्यालयात
शिक्षकच नाही : अनवाणी, उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी मांडली वेदना
धारणी : इयत्ता ८ ते १० वी करीता शिक्षक नियुक्त करा, या प्रमुख मागणीसाठी नजीकच्या बिजुधावडी येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील ६० विद्यार्थी संततधार पावसात उपाशीपोटी अनवाणी पावलांनी धारणी आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडकले. यामुळे येथील आदिवासी विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.
आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षकच नसल्याने येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थानांतरण होत असल्याच्या बाबीवरही यामुळे एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. जवळपास ५०० विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. मात्र, यावर्षी माध्यमिक शाळेत शिक्षकच नही. विद्यार्थ्यांनी अनेकदा याबाबत मुख्याध्यापकांना तक्रारी दिल्यात. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. वर्ग ८ ते १० या ३ वर्गांसाठी केवळ २ विषयांसाठी शिक्षक आहेत. इतर ७ विषयांसाठी, शिक्षकच नसल्याने मागील दीड महिन्यांपासून विद्यार्थी शाळा प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहेत.
अखेरीस बुधवारी सकाळी ८ वाजता ८ वी ते १० वीची ६० मुले पायीच बिजुधावडी येथून धारणीला प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निघाली. सकाळपासून मूसळधार पाऊस पडत होता. परंतु त्याची पर्वा न करता विद्यार्थी छत्री व रेनकोट नसतानाही पायी निघाले. ५ तासांचा प्रवास करीत त्यांनी प्रकल्प कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी षणमुगराजन यांची भेट घेतली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना २ दिवसांत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. मेळघाटातील शिक्षणाची अशी दुर्दशा असल्यामुळेच येथील आदिवासी विद्यार्थी स्थानांतरण करीत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. नंतर त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन तत्काळ शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली.